दहशतवाद हाच आपल्यासमोरील मोठा धोका ; मोदी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • सर्वसमावेशक आणि एकत्रित कारवाईबाबत एकमत झाल्‍याचा दावा
  • भ्याड दहशतवादी हल्ले श्रीलंकेच्या इच्छाशक्तीला पराभूत करू शकत नाहीत,’ मोदी

कोलंबो : दहशतवाद हाच भारत आणि श्रीलंकेसमोरील समान धोका असून, याविरोधात एकत्रितपणे कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. मालदीव दौऱ्यातही मोदींनी दहशतवादाचा प्रश्‍न उपस्थित केला होता.

मालदीव दौरा आटोपून मोदी हे आज श्रीलंकेला आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांची भेट घेतली. गेल्या दहा दिवसांमधील या दोघांची ही दुसरी भेट आहे. सीरिसेना हे मोदींच्या शपथविधीसाठी दिल्लीला आले होते.

‘दहशतवाद हा समान धोका असून, त्याविरोधात सर्वसमावेशक आणि एकत्रित कारवाई करण्याबाबत आमचे एकमत झाले आहे. सुरक्षित भविष्याच्या निर्मितीसाठी भारत कायमच श्रीलंकेच्या बाजूने उभा आहे,’ असे सीरिसेना यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोदींनी ट्विट केले. सीरिसेना यांच्याबरोबर मोदींनी दहशतवादासह इतर विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

तत्पूर्वी, कोलंबो येथील विमानतळावर मोदींचे आगमग झाल्यावर अध्यक्षीय निवासस्थानी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी पाऊस सुरू असताना खुद्द श्रीलंकेच्या अध्यक्षांनीच मोदींच्या डोक्‍यावर छत्री धरली होती. श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत हा श्रीलंकेच्या बाजूने खंबीरपणे उभा असल्याचे मोदी यांच्या या भेटीतून दिसून आले आहे. या हल्ल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिलेच राष्ट्रप्रमुख आहेत. 

अध्यक्षीय निवासस्थानात पोचण्यापूर्वी मोदी यांनी श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी साखळी बाँबस्फोट झालेल्या ठिकाणांपैकी असलेल्या कॅथोलिक चर्चला भेट दिली. येथे त्यांनी या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

‘या धक्‍क्‍यातून श्रीलंका नक्कीच सावरेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. भ्याड दहशतवादी हल्ले श्रीलंकेच्या इच्छाशक्तीला पराभूत करू शकत नाहीत,’ असे मोदी या वेळी म्हणाले. 
तिरुपती दर्शन
मोदी दोन दिवसांचा विदेश दौरा आटोपून भारतात परतले. श्रीलंकेहून मोदी थेट तिरुपतीच्या दर्शनाला आले. 

श्रीलंका दौऱ्यात....
पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांच्या निवासस्थानी अशोक वृक्षाचे रोपण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सीरिसेना यांच्याकडून समाधी बुद्धमूर्तीची प्रतिकृती भेट. ही प्रतिकृती तयार करण्यास दोन वर्षे लागली.

मालदीव दौऱ्यात...
प्रशांत महासागर क्षेत्रात मालदीवबरोबर आर्थिक भागीदारी वाढविण्याचे मोदींकडून आश्‍वासन. पंतप्रधान मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष इम्राहिम सोलिह यांच्या हस्ते भारताने तयार केलेल्या तटरक्षक रडार यंत्रणेचे उद्‌घाटन. 
पुढील पाच वर्षांत मालदीवच्या एक हजार प्रशासकीय अधिकाऱ्यांना भारतातील नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स ही संस्था प्रशिक्षण देणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News