दहावी,बारावीचा कोणता पेपर कधी हे आता हॉलतिकिटाद्वारे समजणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 January 2020

यंदापासून राज्य शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर परीक्षेसंदर्भातील वेळापत्रक दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणता पेपर कधी, किती वाजता कोणत्या सत्रामध्ये आहे हे अचूक कळेल. यामुळे विद्यार्थी परीक्षेला वेळेवर पोचेल. हॉलतिकिटाबाबतचे शासनाचे चांगले धोरण आहे. या बदलाचे विद्यार्थी, महाविद्यालयांकडून स्वागतच आहे

औरंगाबाद :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हॉल तिकिटावर परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना आपला कोणता पेपर किती वाजता आहे, याची सुनिश्‍चित माहिती वेळेवर मिळणार आहे.

पुढील आठवड्यात विज्ञान प्रात्यक्षिकासह भाषा विषयाच्या तोंडी परीक्षा सुरू होतील. त्यानंतर एक ते १७ फेब्रुवारीदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर लेखी परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून सुरवात होईल. शिक्षण मंडळातर्फे यंदा बारावी परीक्षेसाठी गुरवारपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत.

या हॉलतिकिटावर यंदा बदल करण्यात आला आहे. पूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्याचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय कोड, विषयाचे नाव व कोड, केंद्र क्रमांक, उत्तर लेखनाची भाषा आदी प्रकारची माहिती दिली जात होती. परंतु, यंदाच्या परीक्षेपासून मंडळाने अभिनव निर्णय घेतला आहे. यंदापासून विद्यार्थी परीक्षा प्रवेशपत्रावर आता संबंधित विद्यार्थ्यांना कुठल्या विषयाचे पेपर कधी आहे कळविले आहे.

विद्यार्थ्याने परीक्षेसाठी कोणकोणत्या विषयांची निवड केली आहे, हे हॉलतिकिटावरच देण्यात आले आहे. मंडळाने नवीन बदल केला असून विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक प्रवेशपत्रावर उपलब्ध करून दिले आहे. परीक्षेचा विषय व तारीख तसेच सत्र याची ठळक नोंद प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे. या निर्णयाचे महाविद्यालयांनी स्वागत केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News