या गावात आहेत सर्वाधिक मंदिरे 

अभय आपटे
Friday, 8 February 2019

रायगड जिल्ह्यात छोट्याछोट्या गावांचाही मोठा इतिहास आहे. वेगवेगळ्या गावांनी पुरातन काळापासून वेगळी ओळख कमावून ठेवली आहे. त्या वैशिष्ट्यपूर्ण गावांपैकी एक म्हणजे चौल. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्‍यातील एक छोटंस गाव ‘चौल.

     निसर्गाने हिरवा शेला पांघरलेले. एका बाजूला समुद्रकिनारा, पूर्वेकडे डोंगराची रांग असे हे नारळ-सुपारीच्या झाडांनी वेढलेले पुरातन श्रीमंत नगर. या नगराला पौराणिक, ऐतिहासिक असा वैभवशाली इतिहास आहे. चौल म्हणजे ३६० मंदिरे तितकेच तलाव अशी इतिहासात नोंद असली तरी, सुमारे २५० वर्षांपूर्वी मोगलाईत अनेक मंदिरे नष्ट झाली आहेत.
     आता जी काही मंदिरे आहेत, त्यात चौलचे प्रवेशद्वार श्री मुखरी गणेश मंदिर, चंपावती देवी, तुलाडदेवी, कुंडेश्‍वर, रामेश्‍वर मंदिर, एकविरा भगवती देवी ही आता पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहेत.

श्री मुखरी गणेश मंदिर : हे मंदिर चौलच्या प्रवेशद्वाराजवळ असून हे स्वंयभू आहे. सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास असून १७५८ मध्ये लक्ष्मीबाई आंग्रे यांनी त्याचा जीर्णोद्धार केला आहे. चौल मुसलमानी अमलाखाली असताना मुखरी हे नाव अपभ्रशांत्मक रूढ झाले. 

शितलादेवी : हे मंदिर जागृत असून आगरे घराण्याची दृढ श्रद्धा या मंदिरावर होती. शितलादेवी ही सागराला शरण आणणारी असे तिचे महत्त्व असून, राज्य व परराज्यातील अनेक जण वर्षातून एकदातरी तिच्या दर्शनासाठी येतात.

चंपावती देवी : हे मंदिर पुरातन देवस्थान आहे. कोळी, माळी व गुजराती कुटुंबीय मोठ्या संख्येने नवरात्रीत दर्शनाला येतात. सुमारे ४०० वर्षांपूर्वी मंदिर ज्या ठिकाणी होते, त्या परिसरात फक्त सोनचाफ्याची झाडे होती, त्यावरूनच ‘चंपावती’ नाव पडले.

एकविरा भगवती देवी : चौलमधील दुसरे महत्त्वाचे मंदिर असून, आंगरेच्या काळात या मंदिराचा किल्ल्यासारखा उपयोग केलेला असून गाभाऱ्याच्या दरवाज्याच्या वरील बाजूच्या तुळईवर पाच वाक्‍यात जीर्णोद्धाराचे काम कोरलेले आहे.

रामेश्‍वर मंदिर : हे चौलमधील ‘भोसरी’ पाखाडित असून मंदिर कोणी कधी बांधले, याचा उल्लेख नसला तरी आंगरेकालीन उल्लेख आहे. १७४१ मध्ये श्रीभगवान स्वरूप श्रीनिवास दीक्षितबाबा यांनी जीर्णोद्धार केला. त्याला लागलेले द्रव्य नानासाहेब पेशवे व मानाजी आंगरे सरखेल यांनी पुरवले असल्याचा उल्लेख सापडतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News