पाणी पिण्यासाठी सूधारगृहातून किशोरवयीन मुले बाहेर आली आणि...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

मुंबईतील वेगवेगळ्या भागांतून सुटका करण्यात आलेली, पलायन केलेली 75 मुले लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून डोंगरी येथील बालसुधारगृहात अडकून पडली आहेत.

मुंबई : डोंगरी बालसुधारगृहातून तीन किशोरवयीन मुलांनी मंगळवारी पलायन केले. डोंगरी पोलिस या मुलांचा शोध घेत आहेत. ही मुले मूळची नेपाळ, बिहार व पश्‍चिम बंगाल येथील आहेत. बालसुधारगृहातून तीन मुले पळाल्याची तक्रार आली असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे डोंगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप भागडीकर यांनी सांगितले. त्यापैकी एक मुलगा 14 वर्षांचा, दुसरा 16 वर्षांचा व तिसरा 17 वर्षांचा आहे. सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीत ही मुले पळून जाताना पोलिसांना दिसली. पाणी पिण्याच्या बहाण्याने ही मुले सुधारगृहाच्या आवाराबाहेर आली व तेथून त्यांनी पलायन केले. हे तिघे सहा महिन्यांपासून बालसुधारगृहात होते. या सर्व मुलांनी घरातून अनेकदा पलायन केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून, सुधारगृहाकडूनही चौकशी करण्यात येणार आहे.

75 मुले अडकली

मुंबईतील वेगवेगळ्या भागांतून सुटका करण्यात आलेली, पलायन केलेली 75 मुले लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून डोंगरी येथील बालसुधारगृहात अडकून पडली आहेत. बाल कल्याण समितीने संपर्क साधल्यानंतर मुलांचे कुटुंबीय त्यांना घेऊन जातात, परंतु लॉकडाऊनच्या काळात ई-पास, वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढल्यामुळे तीन महिन्यांत केवळ एकच कुटुंब या मुलास नेण्यासाठी डोंगरी बालसुधार गृहात येऊ शकल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

लॉकडाऊनचा फटका

खूप दिवस मुलांना नेण्यासाठी कोणी आले नाही, की त्यांच्या राज्यातील बाल कल्याण विभागांशी संपर्क साधण्यात येतो. त्यानंतर त्या राज्यांतील मुलांना एकत्र पाठवण्यात येते. संबंधित राज्यातील यंत्रणा या मुलांच्या कुटुंबीयांचा शोध घेते व भेट घडवून देते. लॉकडाऊनमध्ये संबंधित राज्यांतील बाल कल्याण विभागांकडून परवानगी न मिळाल्यामुळे या मुलांना परत पाठवणे शक्‍य झाले नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News