गुणपडताळणी ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थी आणि पालकांना तांत्रिक अडचणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने प्रथमच बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मूंल्याकनाचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने प्रथमच बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मूंल्याकनाचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली; मात्र अर्ज करताना विद्यार्थी आणि पालकांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी मंडळाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. या तक्रारींची दखल घेत मंडळाने संकेतस्थळावरील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर मंडळाने शुक्रवारपासून (ता.17) विद्यार्थांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थांना विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे; मात्र अर्ज भरताना संकेतस्थळच न उघडणे व शुल्क भरण्यासही अडचण येत असल्याने पालक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी काही विद्यार्थी-पालकांनी राज्य शिक्षण मंडळाकडे तक्रार केली आहे. तक्रारीनंतर शिक्षण मंडळाने संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

अडचणी आल्यास येथे संपर्क करा
ऑनलाईन अर्ज भरताना विध्यार्थ्यांनी तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी आल्यास किंवा काही शंका असल्यास त्यांनी शिक्षण मंडळाच्या support@msbshse.ac.in या ई-मेल आयडीवर अथवा 020- 25705207, 25705208 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

गुणपडताळणी आणि पुनर्मूंल्यांकनासाठी यंदा प्रथमच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचणी आल्या; मात्र त्या तातडीने दूर करण्यात आल्या असून अर्ज भरण्याची प्रक्रिया आता सुरळीत सुरू आहे.
- शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News