अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020
  • शिक्षण संघटनेचा महापालिकेवर आरोप

मुंबई  : महापालिकेचे शिक्षक जगदीश चौधरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. चौधरी यांच्या कुटुंबीयांना तातडीने 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशा मागण्या शिक्षक भारती संघटनेने आयुक्तांकडे केल्या आहेत. जगदीश चौधरी घाटकोपर येथील मुक्ताबाई महापालिका रुग्णालय कोव्हिड केंद्रात कर्तव्यावर होते. प्रकृतीचा त्रास सुरू झाल्यावर कामातून मुक्त करण्याची विनंती त्यांनी केली होती; मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप शिक्षक भारतीने केला आहे. चौधरी यांना कल्याण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई महापालिकेने चौधरी यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत तात्काळ द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे. संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करावी. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांना कोव्हिड जबाबदारीतून मुक्त करावे, अशा मागण्या महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

एक कोटींची नुकसानभरपाई द्या

शालेय शिक्षण विभागाने 24 जूनला कोरोना कर्तव्यावरील शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करावे, असा आदेश दिला आहे. त्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जगदीश चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप शिक्षक सेलने केला आहे. या शिक्षकाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 50 लाख आणि महापालिकेने 50 लाख अशी एक कोटी रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News