टाटा नॅनो माझी साथीदार

काजल डांगे
Thursday, 16 January 2020

मी माझ्या घरामध्येही टाटा नॅनो कारचे पोस्टर लावून ठेवले होते. इतर महिलांना मी जेव्हा ड्राईव्ह करताना पाहायचे, तेव्हा मला त्यांचे फार कुतूहल वाटायचे. आपली स्वतःची गाडी आपल्या दारासमोर कधी ना कधी तरी उभी असणार, हे माझं स्वप्नच होतं

स्वकमाईतून घेतलेली माझी पहिली कार होती निळ्या रंगाची टाटा नॅनो. ही कार अजूनही माझ्याकडे आहे. गाडी घेण्याची हौस मला होती; पण ती स्वबळावर पूर्ण करायची हेदेखील ठरवलेलं होतं. गंमत म्हणजे मी माझ्या घरामध्येही टाटा नॅनो कारचे पोस्टर लावून ठेवले होते. इतर महिलांना मी जेव्हा ड्राईव्ह करताना पाहायचे, तेव्हा मला त्यांचे फार कुतूहल वाटायचे. आपली स्वतःची गाडी आपल्या दारासमोर कधी ना कधी तरी उभी असणार, हे माझं स्वप्नच होतं आणि २०१६मध्ये माझं हे स्वप्न पूर्ण झालं. 

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘माझे पती सौभाग्यवती’ ही माझी पहिलीवहिली मालिका करत होते. ती करत असतानाच काही पैसे जमवून मी कार बुक केली. माझ्या वाढदिवशीच टाटा नॅनो माझ्या दारासमोर होती. मला अगदी आभाळाएवढा आनंद झाला होता. कारण पहिल्यांदाच स्वतःसाठी कोणती तरी महागडी वस्तू मी खरेदी केली होती. आता मी माझा आणि माझ्या कारचा वाढदिवस एकत्र साजरा करते. माझ्या वाढदिवशी मी माझ्या कारलाही सजवते आणि कारमध्ये छोटा केकही कट करते. कारचा वाढदिवसही साजरा करण्यास मी प्रचंड उत्साही असते. 

टाटा नॅनो माझी साथीदार आहे. मी कधी चिडलेली, अस्वस्थ असले की लगेच गाडी काढते आणि जो काही राग असेल तो तिच्याजवळ मी व्यक्त करते. मला ड्राईव्ह करायला प्रचंड आवडतं. आता मीही ड्राईव्ह करत असताना माझं मन त्यामध्येच रमून जातं. शिवाय माझ्या गाडीमध्ये नेहमीच्या उपयोगी वस्तू असतात. तसेच चटई माझ्याकडे कायम असते. कुठेही लाँग ड्राईव्हला गेले आणि मध्येच थांबावे वाटले की निसर्गरम्य वातावरणात चटई टाकून निवांत आराम करते. माझ्या गाडीने नेहमी मला जपलं आहे. पहिल्यांदाच मी मुंबईबाहेर म्हणजे नाशिकमध्ये माझ्या बहिणीकडे कार घेऊन गेले. तेव्हा ड्राईव्ह करताना तितकासा आत्मविश्‍वास नव्हता; पण निव्वळ माझ्या गाडीची मला साथ लाभली आणि मी तिथवर पोहोचले. 
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News