तान्हाजी सिनेमात घोरपड न दाखविण्याचे 'हे' आहे कारण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020
  • काही ऐतिहासिक पोवाड्यात किंवा लेखण्यात किल्ला सर करण्यासाठी घोरपडीचा उल्लेख करण्यात आला आहे.
  • हा चित्रपट पाहताना कोंढाणा लढाईत "घोरपड" दाखविण्यात आली नसल्याने अनेकांना प्रश्न पडला.

 

मुंबई : ऐतिहासिक चित्रपट "तान्हाजी" बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. पहिल्या आठवड्याचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करत तान्हाजीची घोडदौड सुरु आहे. शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कोंढाण्याची लढाई यामध्ये दाखविण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी  शिवकालीन इतिहास रुपेरी पडद्यावर उमटविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. हा चित्रपट पाहताना कोंढाणा लढाईत "घोरपड" दाखविण्यात आली नसल्याने अनेकांना प्रश्न पडला. काही ऐतिहासिक पोवाड्यात किंवा लेखण्यात किल्ला सर करण्यासाठी घोरपडीचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र चित्रपटात तिचा उल्लेख नाही. याबाबत दिग्दर्शक ओम राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

कोंढाणा किल्ल्याची लढाई ही १६७० साली झाली. त्यानंतर साधारणतः १८३० साली यावर अनेक कथा आणि पोवाडे लिहिले गेले. त्यामध्ये घोरपडीचा उल्लेख करण्यात आला आहे. लहानपणी आख्यायिका किंवा मौखिक कथांच्या आधारे आपल्याला तो घोरपडीचा इतिहास माहित आहे. मात्र ऐतिहासिक बखरीत घोरपडीच्या नावाचा उल्लेख नाही. याबाबत इतिहासाच्या पुस्तकांत देखील काहीच माहिती नाही. आपण शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर कोंढाणासारखा किल्ला सर करणे घोरपडीला शक्य देखील नाही. मात्र हा किल्ला सर करण्यासाठी मावळ्यांचे कौशल्य, शौर्य आणि हिमतीचे अनेक दाखले इतिहासात आहेत. याच कारणामुळे चित्रपटात घोरपड न दाखवता घोरपडे बंधूंचा उल्लेख करण्यात आला आहे, असं ओम राऊत यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.  

कोंढाणा किल्ल्याची लढाई तान्हाजी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. आतापर्यंत तान्हाजी चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. अभिनेता अजय देवगण हा तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत आहेत. अभिनेत्री काजोल हिने तान्हाजी यांची पत्नी सावित्री हिची भूमिका पडद्यावर साकारली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर असून महाराजांच्या भूमिकेला त्याने न्याय दिल्याचं चित्रपट पाहताना दिसून येते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News