तंदूर कोळंबी आणि पुदिना चटणी
- कोळंबी हा असा मासळीचा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
- त्यात तंदुरी कोळंबी म्हंटलं तर खव्वयांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.
- तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता तंदुरी कोळंबी आणि त्यासोबत खाल्ली जाणारी पुदिना चटणी याची रेसिपी घेऊन आली आहे.
कोळंबी हा असा मासळीचा प्रकार आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. आणि त्यात तंदुरी कोळंबी म्हंटलं तर खव्वयांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आज मी खास तुमच्याकरीता तंदुरी कोळंबी आणि त्यासोबत खाल्ली जाणारी पुदिना चटणी याची रेसिपी घेऊन आली आहे.
साहित्य :-
तंदूर कोळंबीसाठी :-
- पावशेर कोळंबी
- एका लिंबाचा रस
- एक ते दोन चमचे लाल तिखट
- एक चमचा काश्मिरी लाल तिखट
- एक पळी वितळलेले बटर
- एक चमचा आलं पेस्ट
- एक चमचा लसूण पेस्ट
- दोन चमचे तंदूर मसाला
- मीठ चवीनुसार
- अर्धा कांदा उभा चिरून
पुदिना चटणीसाठी :-
- एक वाटी पुदिन्याची पाने
- एक वाटी कोथिंबीर
- तीन ते चार चमचे दाणे
- तीन हिरव्या मिरच्या
- 1 ते 2 इंच आलं
- एक ते दोन चमचे चाट मसाला
- एक ते दोन चमचा जिरे पूड
- एक ते चार चमचे आमचूर पावडर
- एक ते दोन चमचे काळ मीठ
- मीठ चवीनुसार
- लींबू रस
- एक चमचा गूळ
कृती :-
तंदूर कोळंबी :-
कोळंबी स्वच्छ धुवुन घ्या आणि त्यातील काळा धागा काढुन घ्या. कोळंबी स्वच्छ करत असताना जर आपण काळ धागा काढला नाही तर तो दाताखाली कचकचतो. कोळंबी मॅरीनेट करण्यासाठी लिंबाचा रस, लाल तिखट, काश्मिरी तिखट, आल आणि लसूण पेस्ट, मीठ, तंदूर मसाला आणि बटर चांगले एकजीव करुन घ्या. या मिश्रणात कोळंबी उत्तम मरीनेट होण्यासाठी कमीत कमी १ तास ठेवा.
ओव्हन १५० डिग्रीवर दहा मिनिटे प्री-हीट करा. कोळंबी ओव्हनमध्ये टाकण्याअगोदर ट्रेवर अॅल्युमिनिअम फॉईल पसरवा. त्यानंतर फॉईलवर कोळंबी पसरवून ठेवा. १८० डिग्रीवर फॅन फोर्स्ड मोडमध्ये १५-२० मिनिटे ठेवा. दर ५ मिनिटांनी कोळंबीची बाजू बदलत रहा. इथे जरा अंदाजानेच आणि लक्ष ठेवून वेळ किती लागतो ते ठरवा. कांदा पाण्यात धुवुन घ्या. त्यात मीठ आणि थोडे काश्मिरी तिखट घाला. कांदा, लिंबू आणि कोळंबी प्लेटमध्ये ठेवून सजवा.
पुदिना चटणी :-
पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर स्वच्छ धवून घ्या. पुदिना चटणीसाठी लागणारे सर्व साहित्य मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून वाटून घ्यावे. अशाप्रकारे पुदिना चटणी तयार होते. पुदिना चटणी ही कोणत्याही तंदुरी प्रकारासोबत खूप छान लागते.