मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीबाबत त्वरित निर्णय घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 April 2020
  • महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे राज्यपालांना पत्र

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबतचा राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेऊन राज्यात पसरलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जनतेमधील संभ्रम दूर करावा. या मागणीचे पत्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पाठवले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे नियमानुसार त्यांनी पदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यात कोणत्यातरी सभागृहाचे सदस्यत्व मिळविणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, सद्य स्थितीत कोणत्याही निवडणूका घेणे शक्य नाही. त्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाने विधान परिषदेवरील रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर, त्यांची नियुक्ती करण्याची शिफारस 9 एप्रिल रोजीच आपल्याकडे केली आहे. तसेच 28 एप्रिल रोजी पुन्हा त्याबाबत स्मरणपत्र दिले आहे.

या घटकपक्षांच्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेली परिस्थितीची आपणांस कल्पना आहे. राज्यातील सारी जनता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे, धडपडत आहे. या अशा आणीबाणीच्या प्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याच पदाविषयी शंका आणि संभ्रम राहणे योग्य नाही. मात्र, राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करुन आज 20 दिवस झाले तरी आपल्या निर्णयाची माहिती राज्यातील जनतेला मिळू शकलेली नाही.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, वास्तवात सद्यस्थिती लक्षात घेता, उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत त्वरित निर्णय घेऊन त्यांना कोरोना विरुद्धच्या लढाईवर लक्ष केंद्रित करण्यास सांगणे राज्याचे प्रमुख या नात्याने आपल्याकडून जनतेला अपेक्षित आहे. मात्र, 20 दिवस होऊनही निर्णय न झाल्याने राज्यातील जनतेत संभ्रम आणि अस्वस्थतेची भावना आहे. त्याकडेच आपले लक्ष वेधण्यासाठी एकप्रकारे जनतेच्या वतीने आम्ही हे पत्र आपल्याला लिहित आहोत.
याबाबत आपण काय निर्णय घेतला आहे, हे राज्यातील जनतेला विनाविलंब कळावे, ही विनंती आहे. आपला निर्णय न होण्यामागे काही तांत्रिक अडचण असेल, राज्य मंत्रिमंडळाने पाठविलेल्या प्रस्तावाबाबत काही आक्षेप वा त्रुटी असतील आणि त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होत असेल तर तेही राज्यातील जनतेला कळले पाहिजे, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. 

या पत्रावर शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, जनता दल (से) महाराष्ट्र प्रा. शरद पाटील ,    न्या. बी. जी. कोळसे पाटील, श्याम गायकवाड, प्रताप होगाडे, राजू कोरडे, प्रभाकर नारकर आदींच्या सह्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News