डोळे म्हणजे मनाचा आरसा, असे समजल्या जाते. त्यात मनातील भावनांचेच नव्हे तर आपल्या आरोग्याचेही प्रतिबिंब दिसून येते. त्यामुळे त्यांची योग्य काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक तणाव, थकवा, आजारपण, आहारात पोषक तत्त्वांचा अभाव आणि वाढते वय या सर्वांचा विपरीत परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत असतो.
खूप वेळ संगणकावर काम करणे, फोनचा अती वापर, खूप वेळ टीव्ही बघणे, अपुऱ्या प्रकाशात वाचन, अपुरी झोप यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो. मानसिक तणाव, थकवा, आजारपण, आहारात पोषक तत्त्वांचा अभाव आणि वाढते वय या सर्वांचा विपरित परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत असतो. डोळ्याखाली काळी वर्तुळे, सूज आणि निस्तेज डोळे ही लक्षणेही दिसून येतात.
उपयुक्त योगाभ्यास
डोळ्यांच्या व्यायामाने स्नायू मजबूत होतात, दृष्टी चांगली होते, एकाग्रता वाढते आणि ताण दूर होऊन डोळ्यांना विश्रांती मिळते. खुर्चीवर किंवा खाली कुठल्याही आरामदायक स्थितीत बसावे.
एका हाताच्या अंगठ्याची डावीकडे, उजवीकडे, वर आणि खाली, घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गोलाकार हालचाल करावी तसेच अंगठा नाकाच्या टोकाशी हळूहळू आणून दूर न्यावा. मान न हलवता अंगठ्याच्या हालचालींकडे बघावे. प्रदीर्घ काळ वाचन किंवा संगणकावर काम करताना प्रत्येक वीस मिनिटांनी वीस सेकंदपर्यंत वीस फूट दूर बघावे. सततच्या प्रखर प्रकाशापासून तसेच कामाच्या तणावापासून डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी दोन्ही हातांचे तळवे घासून हलकेच डोळ्यांवर ठेवल्यास शांत वाटते. समई किंवा मेणबत्तीच्या ज्योती वर लक्ष केंद्रित करून त्राटक क्रिया केल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते.
अधोमुख श्वानासन, हस्तपादासन, शशांकासन, यासारखी योगासने डोळ्यांकडे रक्तप्रवाह वाढवतात आणि त्यांची कार्यक्षमता सुधारतात. नासिकाग्र दृष्टी, शाम्भवी मुद्रा डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. डोळ्यांमध्ये कोरडेपणा किंवा जळजळ होत असल्यास वरुण मुद्रा, तसेच डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी प्राण मुद्रा उपयुक्त आहेत.
काळजी
डोळे सुजले असल्यास, डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली असल्यास, मोतीबिंदू , ग्लुकोमासारखे डोळ्यांचे आजार असल्यास डोळ्यांचे व्यायाम करू नयेत. मधुमेह, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असल्यास ज्यात डोके हृदयाच्या खाली येते अशी योगासने करू नयेत, त्यामुळे डोळ्यांवरही ताण येतो.
स्वस्थ जीवनशैली
‘स्क्रीन टाइम’ कमी करणे, म्हणजेच टीव्ही, फोन व संगणकाचा आवश्यक तेवढाच वापर करणेही डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय पुरेशी झोप, पोषक आहार, ताणतणावाचे नियोजन, रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळणे हे उपाय केल्यास डोळे निरोगी आणि चमकदार होऊ शकतात.