स्वरांची 'काव्यांजली'

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

स्वप्नांचे आणि वास्तवाचे, मिलनाचे आणि विरहाचे, कमालीच्या विश्वासाचे आणि विश्वासघाताचे अनुभव कवेत घेणाऱ्या कविता तेथे वस्तीला आल्या होत्या. जीवनस्पर्शी तत्त्वज्ञान हृदयस्पर्शी शब्दांतून मांडत होत्या. एक एक कविता म्हणजे अद्‌भुत स्मरणगाथा होती. ‘काव्यांजली’ या कार्यक्रमाने येत्या मराठी राजभाषा दिनासाठी सुरेख वातावरणनिर्मिती केली. 

पुणे -  मुंबईच्या ‘पासबाँ-ए-अदब’ (संस्कृतिरक्षक) या संस्थेतर्फे विविध शहरांमध्ये कविसंमेलने दिमाखात साजरी केली जातात. या मैफलीत अनिल कांबळे, समीर सामंत, स्पृहा जोशी, संदीप खरे व वैभव जोशी यांच्या लोकप्रिय कविता त्यांच्याच तोंडून काही आठवणींसह ऐकायला मिळाल्या. कांबळे यांनी ‘त्या कोवळ्या फुलांचा, बाजार पाहिला मी’ या त्यांच्या प्रसिद्ध गीतात समाविष्ट नसलेल्या, ‘खोकताना बाप मेला, माय आजारात गेली, घेऊनी देहास अपुल्या, लेक बाजारात गेली,’ या ओळी सादर करताच काळीज गलबलून गेले. ‘तुला जर द्यायचे आहे, जुने ते प्रहर दे माझे, दवाने चिंब झालेले फुलांचे शहर दे माझे,’ ही कविता भाव खाऊन गेली. 

स्पृहा जोशी यांनी अभिनय क्षेत्रातील अनुभव, अनुभूती मांडत ‘आज किती नंबरचं हसशील,’ या ओळींनी अंतर्मुख केलं. ‘घरटं घरटं म्हटलं तरी ओढ तशी टिकत नाही, चित्रं चित्रं म्हटलं तरी आकाश त्यात मावत नाही,’ असे म्हणत या संवेदनशील अभिनेत्रीने ‘आक्रंदन’ या कवितेने विचार करायला प्रवृत्त केले. खरे यांनी बाप-लेकीच्या नात्यातील निरनिराळे पैलू उलगडणारी ‘सायकल’ ही कविता ऐकवताच रसिकांच्या डोळ्यांत पाणी आले. या उलट ‘स्पायडरमॅनची बायको’ ही कविता ऐकवत त्यांनी क्षणोक्षणी हसवले. ‘कवीचे आयुष्य सोपे असते यासाठी, की एक जरी अस्सल कविता लिहिली त्याने, तरी मरायची मुभा असते त्याला,’ या त्यांच्या कवितेलाही मोठी दाद मिळाली. सामंत यांच्या ‘स्वप्नं विकायची ठरवली तरी झोप विकत घेता येत नाही’, ‘जेव्हा लोकशाहीच बहुमताने हुकूमशाहीला कौल देते’ अशा ओळींनी गदगदून हलवले. या मैफलीची सांगता वैभव जोशी यांच्या हळव्या करून जाणाऱ्या कवितांनी झाली. 

‘यमकांचा बाजार’ ही त्यांची कविता भाषेचा व्यापार करणाऱ्यांवर प्रहार करणारी होती. ‘प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असे नाही,’ या त्यांच्या कवितेतील आर्तता विलक्षण होती.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News