सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : आचाऱ्याची चौकशी; १६ अधिकारी पथकात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या सीबीआय पथकाने आज वांद्रे पोलिस ठाण्यातून सर्व कागदपत्रे आणि सुशांतच्या वस्तू ताब्यात घेतल्या.

मुंबई :-  बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या सीबीआय पथकाने आज वांद्रे पोलिस ठाण्यातून सर्व कागदपत्रे आणि सुशांतच्या वस्तू ताब्यात घेतल्या. या प्रकरणी दिल्लीतून आलेले सीबीआयचे दहा अधिकारी आणि मुंबईतील सहा अधिकारी अशा 16 अधिकाऱ्यांनी विविध अंगाने तपासाला सुरुवात केली आहे.

यातील एका पथकाने वांद्रे पोलिस ठाण्यात जाऊन तपास अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी माहिती घेतली. सुशांत प्रकरणातील तपासाची सर्व कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल, डायरीही ताब्यात घेतली. दुसऱ्या पथकाने सुशांतच्या आचाऱ्याची चौकशी केली. तिसरे पथक सुशांतच्या घरी गेले होते. या ठिकाणी सुशांतच्या आत्महत्येचा प्रसंग उभा करण्यात आला.

दरम्यान, रिया चक्रवर्ती ईडीनंतर आता सीबीआयच्या रडारवर आहे. ती या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. सीबीआयचे पथक कधीही रियाला समन्स बजावू शकते. दुसरीकडे सीबीआयच्या विशेष तपास पथकाने वांद्य्राचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली. प्रोटोकॉलनुसार सुशांत प्रकरणाच्या तपासाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. सीबीआयने या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंतची सर्व माहिती, फॉरेन्सिक पुरावे, शवविच्छेदन अहवाल, नोंदवलेले जबाब ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे सुशांतचा आचारी नूपुर प्रसाद याचीही चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. नीरजने सांगितले होते की, मृत्यूच्या दिवशी त्याने सुशांतला फळाचा रस दिला होता. शिवाय सुशांत दरवाजा उघडत नसल्याचेही त्यानेच सांगितले होते. मुंबई आणि बिहार दोन्ही पोलिसांनी नीरजची चौकशी केली होती. डीआरडीओच्या विश्रांतीगृहामध्ये सीबीआयच्या टीमने त्याची चौकशी करून जबाब नोंदवला. या प्रकरणात दोन उपायुक्तांकडूनही माहिती घेण्यात येणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

बॅंक अधिकाऱ्यांची चौकशी?

सुशांतचे खाते ज्या चार बॅंकेत होते, त्यातील काही बॅंकेच्या अधिकाऱ्यांचीही सीबीआय चौकशी करण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार बॅंक अधिकाऱ्यांना समन्स बजाविण्यात येणार असल्याचे समजते.

सुशांतच्या घराची पुन्हा पाहणी

सीबीआयचे विशेष पथक मुंबईत पुढील दोन-तीन दिवस क्राईम सीन इन्व्हेस्टिगेट करू शकते. एक टीम आज सुशांतच्या वांद्य्रातील घरात गेली होती. पुढील काही दिवसांत विशेष पथक न्यायवैद्यक तज्ज्ञांसह शवविच्छेदन अहवाल, गुन्ह्याचा प्रसंग, फोटोग्राफ, व्हिडीओची तपासणी करणार आहे. क्राईम सीन तपासल्यानंतर फॉरेन्सिक टीम दिल्लीत जाऊन सीएफएसएलमध्ये नमुन्यांची तपासणी करेल. सीबीआयच्या विशेष पथकासोबत जे फॉरेन्सिक तज्ज्ञ आले आहेत, त्यामध्ये फोटो तज्ज्ञ, सायन्टिफिक अँड डिव्हिजन सीएफएसएल दिल्ली या युनिटमधून आहेत. उर्वरित फॉरेन्सिक एक्‍स्पर्ट, टेक्‍निकल फोरेन्सिक एक्‍स्पर्ट, सीएफएसएल दिल्ली युनिटमधून आहेत. एसआयटी क्राईम सीन, फोटोग्राफ, व्हिडीओ, शवविच्छेदन अहवाल, रिक्रिएशनसह मुंबई पोलिसांनी जे नमुने घेतले आहे, त्यांची पुन्हा तपासणी करणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News