पाश्चात्य नवनाट्यतंत्राचे पुरस्कर्ते : संगीतसूर्य केशवराव भोसले

डॉ. सतीश पावडे
Thursday, 6 August 2020

दि. ९ आँगस्ट हा संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा जन्मदिन. या निमित्ताने नाटककार, नाट्यदिग्दर्शक, नाट्यसमीक्षक आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे चरित्रकार डॉ. सतीश पावडे यांचा हा विशेष लेख.

संगीतसूर्य केशवराव भोसले म्हणजे ख-या अर्थाने आधुनिक मराठी रंगभूमीचे शिल्पकार. गायक, अभिनेता,  निर्माता, दिग्दर्शक, प्रयोगधर्मी  प्रयोक्ता, उद्यमी सूत्रधार , सर्वगुण संपन्न, हरहुन्नरी नाटकवाला अशा शब्दात त्यांचे वर्णन करता येईल. ९ आँगस्ट १८९० साली त्यांचा जन्म कोल्हापूर झाला. तर ४ आँक्टोबर १९२१ रोजी पुण्यात टायफाइडने मृत्यू झाला. वय ३१ वर्षे. नाटकाची कारकिर्द २७ वर्षे. या कालात ३१ नाटकातून ५३ भूमिका केल्या. १९०८ साली स्थापन केलेली ललितकलादर्श संस्था आजही कार्यरत आहे. संगीतसूर्य ही पदवी सहजस्फूर्तपणे लोकांनीच त्यांना बहाल केली. संगीत आणि अभिनय शिरोमणी बालगंधर्व यांच्या परमोत्कर्षाच्या काळात एकलव्या प्रमाणे स्वत:चे अस्तित्व त्यांनी आपल्या व्यक्तित्वाने आणि कृतित्वाने सिद्ध केले. त्यांच्या या दोन्ही विशेषांनाही अनेक पैलू आहेत.त्या पैकी पाश्चात्य नाट्यतंत्र आणि नाट्यतत्व यांचा स्वीकार करून रंगभूमीला कशी नवी दिशा दिली, यावर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले प्रत्यक्षात नाटककार नसले तरी प्रयोग संहिता (Production Script) बनवण्यात त्यांचा हातखंडा होता.एक नाट्य दिग्दर्शक म्हणून नाटकातील शक्तीस्थले आणि त्याचा प्रयोग करण्यासाठी ते आपली स्वता:ची प्रयोग संहिता बनवत. त्याचा नाट्य प्रयोगाच्या दृष्टिने उपयोग करीत.आत्माराम दोंदे (मदलसा), मामा वरेरकर(सन्यासाचा संसार), हीराबाई पेडणेकर (दामिनी), वीर वामनराव जोशी(राक्षसी महत्वाकांक्षा), य.ना. टिपणीस (शहा-शिवाजी) यांनीही समय प्रसंगी याची कबुली दिलेली आहे. निर्माता-दिग्दर्शक आणि नाटककाराचा, एका चांगल्या  सादरीकरणासाठी उत्कृष्ट आणि  सर्जनशील  असा सह - संबध (creative Association)  केशवराव भोसले यांच्यापाशी होता. त्यामुळे नाटकात ते प्रभावी बदल सुचवित आणि तसे नाटकानुरूप  परिवर्तन करुन घेत असे.नाटककारही त्यांचा व्यावसायिक अनुभव, अधिकार आणि कौशल्य लक्षात घेऊन तसे बदल आनंदाने करून देत असे. शिवाय नाटककाराच्या आवडी-निवडी, त्यांचा हातखंडा, विशेषता आणि त्यांची विचार पद्धती केशवराव यांना माहित असे.एकुणच या संबंधामधे सृजनशिलता हा महत्वाचा दुवा होता.नाटककाराची शक्तीस्थळे ते सकारात्मक पद्धतीने उपयोगात आणत असे. मामा वरेरकर हे ललितकलादर्शचे बिनीचे नाटककार होते. त्यांच्यावर इब्सेन या जगप्रसिद्ध नाटककाराचा मोठा प्रभाव होता. नाट्यलेखनात इब्सेनी नाट्यतत्वांचा, नाट्यतंत्राचा वरेरकर नेहमी उपयोग करीत. या निमित्ताने केशवराव यांनाही इब्सेनचा परिचय झाला होता. त्यानांही ते आवडल्याने केशवरावांनी नाटककाराच्या माध्यमातून इब्सेनचे नवे नाट्यतंत्र, नाट्यतत्व स्वीकारले होते.

वीर वामनराव जोशी हे समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते. या जाज्वल्य देशभक्तीचा प्रभाव त्यांच्या नाट्यलेखनावर होता. शिवाय आंतोनीन आर्तो या लेखकाच्या 'थिएटर आँफ द क्रुएल्टी'या नाट्यविचारानेही ते प्रभावित झाले होते. या विचारावर आधारित 'राक्षसी महत्वाकांक्षा' हे नाटक त्यांनी लिहिले होते. त्यात 'थिएटर आँफ द क्रुएल्टी' च्या नाट्यतत्व आणि नाट्यतंत्राचा उपयोग केला होता. 'वीर वामनराव जोशी यांची नाटके: समीक्षा व संहिता', या संशोधनपर ग्रंथात डॉ. मधुकर आष्टीकर म्हणतात," आंतोनीन आर्तोच्या  या नाट्यशैलीची सुरूवात वीर वामनराव जोशी यांच्या 'राक्षसी महत्वाकांक्षा' या नाटकाने झाली." यादृष्टीने हे भारतातील  क्रुएल्टी नाट्यतत्वाचे पहिले नाटक ठरावे आणि तो प्रयोग करणारी 'ललितकलादर्श' ही पहिली नाटक मंडळी. ललितकलादर्शचे हे पहिले यशस्वी नाटक. त्या काळात या नाटकाचे शंभरहून अधिक प्रयोग झाल्याची नोंद आहे. केशवरावांना हे नाटक इतके आवडले की त्यांनी उर्दू भाषेत त्याचे भाषांतर करवून घेतले आणि त्याचे प्रयोगही केले. या नाटकाचे खरे श्रेय वीर वामनरावांना जातेच पण केशवरावांसारख्या एका दृष्ट्या निर्मात्याला, दिग्दर्शकालाही जाते. वामनरावांच्या सानिध्यात केशवरावांचा परिचय 'थिएटर आँफ द क्रुएल्टी' च्या नाट्यतंत्राशी झाला होता आणि त्याचा उपयोगही केशवरावांनी गंभीरपणे केला होता. नाटककार आणि निर्माता - दिग्दर्शक यांच्या 'सह-संबंधा'चे हे एक सृजनशील उदाहरण आहे. क्रुरतेच्या नाट्यात्मक परिसीमा केशवरावांनी आपल्या दिग्दर्शनातून आपल्या प्रतिरोधक पात्राच्या अभिनयातून दाखविली. यात त्यांनी मृणालिनीची अविस्मरणीय भूमिका केली होती. सत्तापिपासू, राक्षसी महत्वाकांक्षा धारण केलेल्या मदालसेच्या क्रुरतेशी   मृणालिनी संघर्ष करते. अशा प्रकारे प्रेक्षकांना नवनाट्य तंत्राचे दर्शन केशवरावांनी आपल्या नाट्यप्रयोगातून घडविले. केशवरावांच्या लढवय्या मृणालिनीच्या भूमिकेला त्याकाळी प्रचंड लोकप्रियता लाभली होती.

इब्सेनीयन (सामाजिक सुधारणावादी नाट्यतत्व) आणि क्रुएल्टी (जीवनातील क्रौर्य आणि हिंसेचे नाट्यात्मक दर्शन) थिएटरच्या नाट्यतंत्राचा प्रयोग त्यांनी केला.त्याच काळात मुंबई, पुण्यासह संपूर्ण भारतातही पारशी रंगभूमी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. त्याचाही प्रभाव केशवरावांवर पडला होता. विशेष म्हणजे या रंगभूमीचा जन्म एलिझाबेथन अर्थात शेक्सपिरीयन रंगभूमीच्या प्रभावातून आणि इंग्रजांच्या सानिध्यात झाला होता. मराठी रंगभूमीवर या दोन्ही रंगभूमीचा प्रभाव बुकिश नाट्यपरंपरे पासूनच सुरू झाला होता. केशवरावांच्या काळात आगा हश्र कश्मीरी हे महान पारशी नाटककार अस्तित्वात होते. नाटककार म्हणूनही ते लोकप्रिय होते. त्या काळात त्यांना भारतीय शेक्सपियर म्हटले जात होते. शेक्सपियरची आणि शेक्सपिरीयन तंत्राची नाटके ते करीत. हा ओनामा गिरवतच  इब्सेनीयन नाट्यतत्वाचे  'राक्षसी महत्वाकांक्षा' हे नाटक 'कमाले हिर्स' या नावाने  हिंदी मिश्रित उर्दूत भाषेत  शेक्सपिरीयन नाट्यतंत्रात केशवरावांनी  सादर केले होते.

या नाटकाच्या निमित्ताने केशवरावांनी त्यांचा स्वभाव आणि कार्यशैली बघता निश्चितच पारशी नाटकांचा अभ्यास केला असेल. त्या काळात आगा हश्र कश्मीरी यांची शेक्सपियरची भाषांतरीत सफेद खून(किंग लियर),ख्वाब ऐ हस्ती (किंग जाँन), सैद ऐ हवस (विंटर्स टेल),खुबसूरत बला(मँकबेथ), आणि शेक्सपिरीयन थाटाची भारतीबाला,रूस्तम ऐ सोहराब, यहुदी की लडकी ही नाटके खूप गाजत होती. उर्दू भाषेची नजाकत आणि रूतबा त्यांना हमखास आवडला असेल. अर्थात ही   पारशी नाटके त्यांनी निश्चितच बघितली असतील, तेव्हाच ते पारशी पद्धतीचे उर्दू नाटक करण्यास प्रेरीत झाले असावे. त्यांनी त्यासाठी उर्दू-हिंदीचा अभ्यास केला असेल. त्यांची  संवाद पद्धती, गीत-संगीत गायकीचे अनुकरण केले असतील हे नाकारता येत नाही.

याच काळात चित्रपटाचे युग सुरू झाले होते. त्याचे आकर्षक वाढत होते. ते बघून केशवरावांनी चक्क प्रोजेक्टर वापरून नेपथ्यासाठी रेल्वेस्टेशन आणि रेल्वेच्या दृश्याचा उपयोग केला. म्हणजे त्याकाळातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी विशेषत्वाने केला.

एकुणच रंगभूमीला काळाचे भान त्यांनी दिले. काळानुरूप नवी अभिरूची घडविण्याचा प्रयत्न केला. नव्या नाट्यतंत्र, नाट्यतत्वांचे स्वागत केले. नाट्यनिर्मितीचा नवा 'ड्राँफ्ट' आणि  नवे 'क्राफ्ट' त्यांनी रूजविले. केशवरावांची एकुणच सारी कारकिर्द अचंभित करणारी आहे. त्यांच्या कारकिर्दीचे खरे मूल्यमापन आजतागायत झाले नाही, हे वास्तव आहे.

(डॉ. सतीश पावडे लिखित "संगीतसूर्य केशवराव भोसले : आधुनिक मराठी रंगभूमीचा शिल्पकार" या चरित्रातून साभार.) डॉ. सतीश पावडे याचा संपर्क क्रमांक 9372150158, 9422535158

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News