रस्त्याच्या कडेला पडलेल्या युवकाच्या मदतीला धावले अधीक्षक अभियंता

सुनयना येवतकार
Friday, 4 September 2020
  • -माणुसकीचा प्रत्यय,  कुटुंबीयांनी मानले आभार

यवतमाळ : वेळ रात्री नऊची. एक विसएकवीस वर्षाचा युवक रस्त्याच्या कडेला विव्हळत पडलेला. पाणी पाणी करीत होता. वाटेने चालणाऱ्या दोन महिलांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्या त्याचा मदतीला पुढे सरसावल्या. हे पाहून सरकारी बंगल्यातून एक व्यक्ती मदतीला धावून आली. त्यांनी घरातून पाणी आणले. त्या तरुणाला पाणी पाजले.  काही वेळात तो तरूण शुद्धीवर आला. त्याला मानसिक आधार दिला. संकटात सापडलेल्या एका युवकाला मदतीचा हात देऊन त्यांनी माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती दिली. मदत करणारी ती व्यक्ती कोणी सामान्य नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार आहेत. 

येथील माधवनगर परिसरातील एक मानसिक आजारी असलेला तरुण रात्री घरून निघून गेला होता. त्यामुळे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. परंतु, तो येथील मेडिकल चौकात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या बंगल्यासमोर असलेल्या रस्त्याच्या कडेला बेशुद्ध होऊन पडला होता. पाणी पाणी करीत विव्हळत होता. हे दृष्य तनिष्का सदस्य व उप-अभियंता प्रज्ञा नरवाडे व अश्विता गाढवे यांनी बघितले. त्या त्याच्या मदतीला धावल्या. हे बघून बंगल्यातून अधीक्षक अभियंता तातडीने पाण्याचे बॉटल घेऊन आले. त्यांनी त्या तरुणाला पाणी पाजले. त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारले. काही वेळांत तो तरुण शुद्धीवर आला. त्याला धीर दिला. समज दिली. त्यानंतर त्याला त्याच्या माधवनगर येथील घरी नेऊन सोडण्यात आले. आज कोविडमुळे सुरक्षित अंतर राखताना माणूसच माणसापासून दूर होत चालला असताना कोणी एकमेकांजवळ उभे राहायला बघत नाही. अंतर ठेवूनच वागतात. अशा परिस्थितीत एखाद्या वअनोळखी व्यक्तीला संकटात मदत करून अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी मानवतेचा परिचय दिला आहे. त्या तरुणांच्या कुटुंबीयांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News