सुपर हिरोज!! 

कोमल खांबे
Tuesday, 11 August 2020
  • लाॅकडाऊन सुरू झाला पण दिवसभर घरात बसून  करणार काय हा प्रश्न जवळजवळ सगळ्यांनाच पडला होता. त्यातच मनोरंजन म्हणून डी डी नॅशनल वर रामायण, महाभारत सुरू करण्यात आलं, त्यामुळे अनेक जण फ्लॅशबॅक मध्ये गेले.

लाॅकडाऊन सुरू झाला पण दिवसभर घरात बसून  करणार काय हा प्रश्न जवळजवळ सगळ्यांनाच पडला होता. त्यातच मनोरंजन म्हणून डी डी नॅशनल वर रामायण, महाभारत सुरू करण्यात आलं, त्यामुळे अनेक जण फ्लॅशबॅक मध्ये गेले. काही दिवसांनंतर शक्तिमान सुरु झाल्यावर तर आनंदी आनंद झाला. कारण शक्तिमान हा आम्हां 90's वाल्यांचा सुपरहिरो!!पण आजच्या सुपरहिरो ची व्याख्या बदललीय का? 

कोरोनाचं सावट सध्या पूर्ण जगावर अाहे. संपूर्ण जग कोरेनाविरूद्ध लढा देतयं आणि कोरोनापासून मुक्त होण्याचा मार्ग शोधतंय. सगळीकडे लाॅकडाऊन असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घरी आहे. पण डाॅक्टर आणि पोलिसांनी मात्र स्वत:ला आपल्या ड्युटी मध्ये लाॅक करून घेतलंय, असंच म्हणावं लागेल.  जिवाची पर्वा न करता ते आॅन ड्युटी २४ तास आपलं कर्तव्य बजावत आहे. यासोबतच सफाई कामगार, पालिका कर्मचारी, अंगणवाडी सेविका हे देखील कोरोना च्या लढाई मध्ये आपलं काम अगदी चोख पणे पार पाडत आहेत. देशाचे पंतप्रधान असो वा राज्याचे मुख्यमंत्री सगळेच आपापल्या परीने कोरोनाच्या या लढाईत आपलं मनोबल वाढवण्याचं प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळेच आजचे हे सगळेच सुपरहिरोज आहेत. पण या सगळ्यात विशेष सलाम करावासा वाटतो ते रस्त्यावर उन्हातान्हात उभं राहणार्या पोलिस बांधवाला आणि हाॅस्पिटलमध्ये कोरोनाशी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर्सला!! एक जणू विठेवर उभा आहे आणि दुसरा हाॅस्पिटलला मंदिर बनवण्याचा प्रयत्न करतोय. पण अशा कठीण परिस्थितीत ही त्यांच्यावरच हल्ले होतात. या सगळ्यामुळे निश्चितचं त्यांचं ही मनोबल खच्ची होत असणार. पण तरीही ते आपल्या देशासाठी, बांधवांसाठी एक चुकार शब्द ही न काढता पुन्हा उभे राहतात. कोरोनाशी मोठ्या हिमतीने लढा करणारे हे जणू देवदूत चं!! 

सुपरहिरो म्हटलं की पटकन सगळ्यांच्या डोळयासमोर उभे राहतात मारवेल्स च्या सिरीज मधले स्पायडरमॅन, बॅटमॅन , आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, हल्क...काय आणि किती नावं घ्यावी. अगदी बालवाडीतल्या मुलांपासून ते माेठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडात हिच नावं! त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? शक्तिमान असो वा कॅप्टन अमेरिका या सगळ्यांना सुपरहिरोज म्हणून दाखवलं गेलं आणि म्हणूनच ते डोक्यात सुपरहिरो म्हणून फिट आहेत. पण आज मात्र कुठल्याही कानाकोपऱ्यातून हातातून रशी टाकत स्पायडरमॅन येताना दिसत नाहिये रॅदर तो कधी येणारचं नाहीये कारण तो काल्पनिक आहे.

एप्रिल महिन्यात दोन बाॅलिवूड कलाकार पडद्याआड गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी मनाला चटका लावणारी होती. संपूर्ण देश हळहळला. परंतु त्याच कालावधीत श्रीनगर येथील हंदवाडा मध्ये गेल्या तीन दिवसांत आतंकवादी हल्ल्यांमध्ये सीआरपीएफ चे आठ जवान शहीद झाले. ही बातमी देशातील ५०% लोकांना ठाऊकही नसेल. आणि ज्यांना ठाऊक आहे, त्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहून आपलं काम केलं आहे. या बातमीमुळे मनाला चटका लागत नाही. कारण आपण आपल्या सुपरहिरोज ना सुपरहिरोज म्हणून कधी पाहिलचं नाही. त्यामुळे 'उरी' सारखे सिनेमे सुद्धा थिएटरमध्ये 'भारतमाता की जय! ' एवढंच बोलण्यापर्यंतच सीमित राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात साधूंची हत्या होते, डाॅक्टर-पोलिसांवर हल्ले होतात, ही चितेंची नाही लंछनास्पद बाब आहे. आपण रिल हिरोज ना आपले रिअल हिरोज मानत आलो आहोत. रस्त्यावर उभं असणाऱ्या हवालदाराला पांडू म्हणण्यापर्यंतचं आपली बुद्धी चालते. पण याच पांडूने(शहीद तुकाराम ओंबळे) २६/११ च्या हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाब ला पकडून दिलं होतं, हे आपण पूर्त विसरतो. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटिल, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, आयपीएस अधिकारी अभिनव देशमुख हे आज राज्यात उत्तम कामगिरी बजावत आहेत. खरं तर त्यांनी पोलीस दलाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला आहे. पण सिनेमामधला सिंघमच आमच्या लक्षात राहतो, हे आमचं दुर्दैव! 
             मुळात आजचे सुपरहिरोज आपले खरे सुपरहिरोज आहेत, हे कळायला एवढा उशीर का झाला? कोरोना सारखी अनेक संकटं आजवर येऊन गेली, तेव्हाही या सुपरहिरोज ने आपली कामगिरी बजावली. पण आपण त्यांना तेवढ्यापुरतंच लक्षात ठेवलं. आतातरी आपण आपल्या खर्या सुपरहिरोज ची व्याख्या बदलली पाहिजे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News