सुपर हिरोंची सुपर फॅशन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 21 August 2019

ल हानपणी कार्टून्स, कॉमिक पुस्तकांमधून आपल्याला भेटलेले सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, ॲव्हेंजर्स मोठ्या पडद्यावर थ्रीडी, फोरडीच्या स्वरूपात आल्यावर त्यांचा प्रभाव केवळ लहान मुलांपर्यंत उरत नाही; तर आबालवृद्ध त्यांच्या प्रेमात पडतात. यंदाचं वर्ष तर या सुपर हिरोंचं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

सिनेमा आणि फॅशन यांचं नातं एकमेकांमध्ये किती घट्ट गुंफलेलं आहे, हे वेगळं सांगायला नको. अगदी सातासमुद्रापारची हॉलीवूडनगरी असो किंवा आपली हक्काची बॉलीवूड मायानगरी; सिनेमातील नटनट्या, त्यांचे कपडे, मेकअप, हेअरस्टाईल्स, दागिने याचं आकर्षण आपल्याला असतंच. त्यामुळे एकदा एखाद्या सिनेमातील फॅशनबद्दल कॉलेज कट्ट्यावर चर्चा सुरू झाल्या, की तिचं आगमन बाजारपेठांमध्ये होण्यास सुरवात होते. सुपर हिरोंची मोहिनी तर वेगळीच आहे.

लहानपणी कार्टून्स, कॉमिक पुस्तकांमधून आपल्याला भेटलेले सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, ॲव्हेंजर्स मोठ्या पडद्यावर थ्रीडी, फोरडीच्या स्वरूपात आल्यावर त्यांचा प्रभाव केवळ लहान मुलांपर्यंत उरत नाही; तर आबालवृद्ध त्यांच्या प्रेमात पडतात. यंदाचं वर्ष तर या सुपर हिरोंचं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण डेडपूल, बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन हे सिनेमे नुकतेच प्रदर्शित झाले आहेत आणि येत्या काही महिन्यांत कॅप्टन अमेरिका, एक्‍स मॅन, निंजा टर्टल्स, स्टार ट्रक हे सिनेमे येऊ घातले आहेत. अशा वेळी फॅशन क्षेत्र या सुपर हिरोंकडे दुर्लक्ष करील, असं होणे शक्‍यच नाही.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत सुपर हिरोंवर प्रभावित कपडे असा विषय निघाला की लेदरचे सूट, मोठ्ठाले केप, तोंड झाकणारा मास्क इतकंच डोळ्यासमोर येत असे. सुपरमॅनप्रमाणे निळे कपडे आणि त्यावर लाल चड्डी किंवा स्पायडरमॅनप्रमाणे अंगभर पॉलिएस्टर सूट घालण्याचे धाडस कोणीच केलं नसतं. फार तर लहान मुलांची बर्थडे पार्टी, शाळेतील फॅन्सी ड्रेस स्पर्धा यानिमित्ताने हे पोशाख घातले जायचे. पण सध्या याच सुपर हिरोंवर प्रेरणा घेतलेले अनेक कपडे, ज्वेलरी, ॲक्‍सेसरीज बाजारात आल्या आहेत.

शहरात कोणतंही संकट आल्यावर चेहऱ्यावर मास्क लावून, आपली खरी ओळख लपवून हे सुपरहिरो आपल्या मदतीस येतात, ही या सुपर हिरोंबाबतची मूळ संकल्पना असते. त्यामुळे त्यांना मिळालेल्या किंवा त्यांनी कमविलेल्या शक्ती, त्यांचा मुलखावेगळा पोशाख, त्यांची बोधचिन्हे, मास्क हीच त्यांची मूळ ओळख असते. त्याचंच गारूड प्रेक्षक आणि चाहत्यांवर असतं. याच बाबींना केंद्रस्थानी ठेवून विविध कपडे बाजारात आले आहेत. आपल्या रोजच्या वापरातील टी-शर्टस, शॉर्ट पॅंट्‌स, जॅकेट्‌स, शूज, ज्वेलरी यांच्यावर या बोधचिन्ह, मार्क्‍स यांची छाप पाहायला कपडे सुपरहिरोंचे मास्क, चेहरे, प्रिंट केलेले टी-शर्ट, गंजी, क्रॉप टॉप, शॉर्ट पॅंट, टाय, जॅकेट्‌स सध्या बाजारात पाहायला मिळतील. विशेषतः बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन या चित्रपटाच्या टायटलमध्ये या दोघांचे बोधचिन्ह एकत्र करून तयार केलेलं नवीन चिन्ह सध्या तरुणांमध्ये अधिक प्रसिद्ध आहे.

काळ्या आणि लाल छटेतील या चिन्हाचे प्रिंट असलेल्या टी-शर्टसना मोठी मागणी आहे. तसेच कॅप्टन अमेरिकाची ढाल, आयनमॅनचा मुखवटा, ॲव्हेंजर्सचा लोगो, स्टार वॉरमधील मुखवटे यांचे प्रिंट्‌स तुम्हाला कपड्यांवर पाहायला मिळतील. 

बॅटमॅनचा शत्रू जोकर यानेही टी-शर्टसमध्ये स्वतःचे स्थान पटकावले आहे. हे कपडे युनिसेक्‍स प्रकारात मोडतात. त्यामुळे मुलांप्रमाणेच मुलीसुद्धा त्यांच्या लाडक्‍या सुपरहिरोचे कपडे सहज मिरवू शकतात. अगदी ऑफिसच्या नेहमीच्या रटाळ टायवरसुद्धा सुपरमॅन, बॅटमॅनच्या लोगोच्या छबी पाहायला मिळतात. कपड्यांच्या किमती दुकान आणि परिसरानुसार वेगवेगळ्या आहेत. साधारणपणे २०० रुपयांपासून अगदी हजार रुपयांपर्यंत या कपड्यांचे विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

ॲक्‍सेसरीज सुपरहिरोंच्या लोगोचे किचेन सध्या लोकप्रिय आहेतच. पण त्यासोबत ब्रेसलेट्‌स, अंगठ्या, पेंडेंट्‌स यांवरसुद्धा हे लोगो पाहायला मिळतात. मोबाईल हा तरुणाईचा जीव की प्राण. त्यात दरवेळी ट्रेंडी मोबाईल कव्हर मिरवणं हा त्यांचा लाडका उद्योग. या कव्हर्सवरसुद्धा सुपरहिरोंनी जागा पटकावली आहे. आयनमॅन, ॲव्हेंजर्स, बॅटमॅन, 

सुपरमॅन, स्टार वॉरचे प्रिंट असलेले कव्हर्स बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठी ‘आय एम नॉट सुपरमॅन’ अशा खास मार्मिक टिप्पणीचे कव्हर्ससुद्धा बाजारात आहेत. सुपरहिरोंचे लोगो प्रिंट केलेले कॅन्व्हास शूजसुद्धा फॅशन स्ट्रीटवर आले आहेत. ५० रुपयांच्या कीचेनपासून ब्रेसलेट, अंगठ्या, पेंडेंट्‌सच्या किंमती ५०० रुपयांपर्यंत जातात. मोबाईल कव्हर्स २०० रुपयांपासून सहज मिळतील. शूजच्या किमती ५०० ते हजाराच्या घरात आहेत.

नेलआर्ट सध्या तरुणींमध्ये प्रसिद्ध आहे. अगदी यू-ट्यूबवरील व्हििडओ पाहून घरच्या घरी नेलआर्ट करण्यापासून ते नेलपार्लर्समध्ये जाऊन महागडे नेलआर्ट करण्याची त्यांची तयारी असते. सध्या अनेक नेलपार्लर्समध्ये सुपरहिरोंचे लोगो नखांवर काढून मिळतात. त्यासाठी तुमची २००० ते ५००० रुपये खर्च करायची तयारी असली पाहिजे. यू-ट्यूबवर या संदर्भातील व्हििडओसुद्धा उपलब्ध आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News