पुर्वी उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या की... मुंबईचे चाकरमनी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

पुर्वी उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या की, ‘मुंबईकडील चाकरमान्यांची पावले आपोआप गावाकडे यायची
संजय पाटील, पिशवीकर, मोबा. ८३२९८३८१३२.

पुर्वी उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्या की, ‘मुंबईकडील चाकरमान्यांची पावले आपोआप गावाकडे यायची. खुराड्यात कोंबल्याप्रमाणे असलेल्या वातावरणामधून बाहेर पडून गावाकडे आले की, मुलांना तुरुंगातून सुटल्यासारखे वाटायचे आणि त्यामुळे महिनाभर या मुलांना आवरता आवरता त्याच्या आई-वडिलांच्या नाकीनऊ यायचे. सुटीवरून परत जाताना यापैकी बऱ्याचजणांना काहीना काही दुखापत झालेली असायचीच. कुणाचा हात मोडलेला, कोणाचे डोके फुटलेले पण त्यांना त्याचे काहीच वाटायचे नाही. उलट महिन्याभराच्या सुटीचा आनंद घेऊन एक प्रकारे पुन्हा रिचार्ज होऊन ही सगळी मंडळी पुन्हा आपल्या घरी परतायची.

आमच्या विद्यार्थिदशेमध्ये परीक्षा संपल्या की, सुटीचे वेध लागायचे. निकाल कळेपर्यंत शाळेमध्ये सामुदायिक जेवण, शेतीशाळा, कार्यानुभवाच्या वस्तू बनविणे असे काही ना काही उपक्रम चालूच असायचे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत शाळा गजबजलेल्या असायच्या. ज्यांना पास व्हायची खात्री नाही अशाची धाकधूक वाढायची, तर ज्यांना यशाची खात्री ते पुढच्या वर्गातील मुलांची जुनी पुस्तके शोधण्यासाठी हिंडत असायची. त्यावेळी आतासारखी दरवर्षी नवीन पाठ्यपुस्तके मिळायची नाहीत. जुनी पुस्तके मिळवायची, ती फाटली असल्यास शिवायची, त्याची पाने चिकटवायची, त्यांना कव्हर घालायचे आणि वर्षभर वापरून पुन्हा निम्म्या किमतीवर मागील वर्गातील विद्यार्थ्यांना ती विकून टाकायची. जुन्या वह्यातील कोरी पाने एकत्र करून ती शिवून पुढील वर्षासाठी वही तयार करावी. अशी सगळी पुढच्या वर्षांची पूर्वतयारी झाली की, मग आमचा मोर्चा खेळाकडे वळायचा.

दरम्यान, एक दोन वळीव पाऊस लागून गेलेले असायचे. त्यामुळे शेता-शिवारामध्ये बारीक हिरवे गवत उगवलेले असायचे. मग सकाळी उठून तोंड धुऊन चहा प्यायचा आणि गुरे घेऊन रानात जायचे.  इकडे आम्हा मुलाचे सूरपारंब्या, लाठीकाठी, आट्यापाट्या, गोट्या आणि खेड्यापाड्यात नुकताच प्रसार राहायला लागलेला क्रिकेट याचा डाव रंगायचा. या खेळामध्ये, ओढ्यामध्ये झरे काढण्यात आम्ही इतके, गुंग व्हायचो की, काही वेळा गुरे कंटाळून घरी जायची. गुरे घरी आली पण मुले कुठे राहिली म्हणून आई-वडील रानात शोधायला यायचे. कुणाच्या तरी पालकाची शिवी कानावर आली की, मग आम्ही भानावर यायचो आणि खेळ तिथेच टाकून घरी पळ काढायचो. पुन्हा दिवसभर पोहणे, जांभळे काढणे, मधमाशाचे पोळे काढणे असे उपद्‌व्याप चालूच असायचे. त्यातून कधीकधी ढोपरे फुटायची, झाडावरून पडून दुखापत व्हायची, मधमाश्‍या चावून तोंड सुजायचे. त्यामुळे पालक वैतागून मुलांची सुटी लवकर संपू दे म्हणायचे. 

मुंबई-पुण्याहून आलेल्या मुलांना याचे अप्रूप वाटायचे. त्यावेळी घरोघरी टीव्ही नव्हता. त्यामुळे रात्रीची जेवणे झाली की, ज्येष्ठांच्या गप्पा अंगणामध्ये रंगायच्या. त्या गप्पा ऐकत ऐकत आम्ही झोपी जायचो ते सकाळी कोकिळेच्या कुहुकुहूनेच जाग यायची. आता हे सगळेच बदललेय. मोबाईल वा इंटरनेटच्या जमान्यात मुले मैदानावरचे खेळच विसरून गेली आहेत. टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यावरील पग्ब्जीसारख्या खेळातच मुले डोके खुपसून बसलेली असतात आणि संध्याकाळी सगळीजणं टीव्हीमध्ये डोके खुपसून बसलेली  असतात. माणसामाणसांमध्ये संवाद होणार कधी? आणि कसा? काही काही पालक आपल्या पाल्यांना सुट्टीतील छंद वर्ग, डान्सिंग,संगीत, स्विमिंग अशा क्‍लासेसना घालतात. पण अशा बंदिस्त जीवनामुळे मुले सुटीचा निर्भेळ आनंद घेणार कधी?आणि कसा?

विहिरीमध्ये, नदीमध्ये मनसोक्त डुंबण्याची मजा स्विमिंग पूलमध्ये थोडीच येणार आहे? झाडावर चढून काढलेल्या आंब्या- जांभळाची सर पॅकिंगमधल्या ज्यूस किंवा ‘माझा’च्या बाटलीला येईलच कशी? त्यासाठी झाडावर चढले पाहिजे, त्यावरून पडले पाहिजे आणि त्यानंतर कोपरापर्यंत रसाचे ओघळ येईपर्यंत चोखून खाल्लेल्या आंब्याची चव काय असते ते शब्दांनी सांगता येण्यासारखे नाही. सध्याच्या धावपळीच्या युगात हे सगळेच आनंद , सगळे खेळ हरवत चालले आहेत. ‘आट्यापाट्यासारखा अस्सल ग्रामीण मराठी खेळ खेळणे तर लांबच पण त्याचे नावही आज ऐकायला मिळत नाही. सुखाच्या मागे धावता धावता माणूस हे सगळे आनंद हरवत चालला आहे. सुटीतील मैदानावरील मुलांचा वावर कमी झाला आहे, त्यामुळेच की काय ही मुले आयुष्याच्या मैदानात कमी पडताहेत असे वाटते. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यामुळे सुटीतील धांगडधिंगा, मौजमजा, मस्ती हे कुठेतरी हरवत चालले आहे, हे मात्र नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News