लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील पोलिस खात्यात कर्मचारी असलेल्या वडिलांच्या घरात जन्मलेल्या गजानन जाधव यांनी लहानपणीच शिक्षक व्हायचे ठरवले होते. वडील पोलिस असल्याने सतत बदल्या आणि घरापासून लांब राहत होते. संस्कार आणि धाक आईचेच. घरात दोन चुलतभाऊ शिक्षक, वडील पोलिस, तर काका सैन्यात. मराठवाड्यातील दुष्काळी भागात घरची सात एकर शेती काही उपयोगाची नव्हती. त्यामुळे शिका आणि नोकरी धरा या सूत्राला पर्याय नव्हता.
गजानन यांनी शाळेकडे जाणारी वाट निवडली. बारावीपर्यंत शिक्षण करून डी.एड केले आणि १२ जून २००६ ला रायगड जिल्हा परिषदेचे बोलावणे आल्याने कोकणाची वाट धरली.
तीन वर्षे कोकणात नोकरी करून गावाकडची वाट धरायची, असे मनाशी ठरवून त्यांनी जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पाले खुर्द आदिवासी वाडी येथे शिकवण्यास सुरुवात केली. उंच डोंगरावर असलेल्या शाळेत पायी चालत जाताना शाळा जेवढी जवळ दिसते, तेवढी जवळ नसल्याचा त्यांना अनुभव आला. शाळेवर पोहोचले तेव्हा त्यांनी आदिवासी वाडी पाहिली. आपण वाचलेले वर्णने आणि केलेल्या कल्पना यांच्यापेक्षा आदिवासी वाडी वेगळी असते, हे त्यांच्या लक्षात आले. मुलांचे स्वास्थ्य, स्वच्छतेबाबत काम करावेच लागेल, याबाबत त्यांनी मनाशी निश्चय केला. पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्या लक्षात आले की, मुख्य प्रवाहापासून दूर राहणाऱ्या आदिवासी समाजाची तान्हुली मुले शुद्ध मराठी भाषेबाबत परकी भाषा असल्याचा दबाव घेऊन शाळेपासून दूर राहतात. त्यांना शाळेत टिकवायचे असेल, तर त्यांच्या भाषेत शिकवले आणि संवाद साधला पाहिजे. हा विचार मनात येताच त्यांनी मुलांकडून आदिवासी भाषा शिकायला सुरुवात केली. मुलांना विविध शब्द विचारून त्यांनी १०० शब्दांचा संच तयार केला. या शब्दकोशाला चांगला प्रतिसाद मिळाला. या शब्दकोशाचा मुलांशी संवाद साधताना चांगला उपयोग होत होता. त्याचबरोबर त्यांची बोलीभाषा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी पहिल्या इयत्तेचे पुस्तकच कातकरी भाषेत अनुवादीत केले. याची एक पीडीएफ बनवून शिक्षकांना पाठवून दिली.
कातकरी भाषेतील स्वतः या गोष्टी, कविता मुलांना वाचून दाखवू लागले. वाडीवरच्या भाषेत गोष्टी, कविता असतात याचे मुलांना खूप आश्चर्य व अप्रूप वाटू लागले. भाषेमुळे मुलांना शाळेबद्दल ओढ आणि गोडवा निर्माण झाला आणि मुले नियमित शाळेत येऊ लागली. परिणामी, मुलांची उपस्थिती वाढली. याच दरम्यान ‘वारी’अंतर्गत त्यांनी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवला.
राज्यभरातील शिक्षकांना आणि शिक्षण अधिकाऱ्यांना या उपक्रमाची उपयोगिता कळून आली. राज्यातील इतर शिक्षकांनीही बोलीभाषेत गोष्टी, कविता भाषांतरित करून मुलांना शिकवायला सुरुवात केल्याने शाळेतील पट वाढत असल्याचा अनुभव आला. त्याच दरम्यान पुस्तक प्रकाशित करून त्याचा वापर जिल्ह्यातील सर्व आदिवासी शाळांतून व्हावा, याबाबत हालचाली सुरू होत्या. यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे ठरवले. त्यांनी काही सहशिक्षकांना सोबत घेऊन जोरकस प्रयत्न केले.
अभ्यासक्रम भाषांतरित करून उपयोग होण्यासारखा नव्हता. कारण अभ्यासक्रम कधीही बदलते; मात्र शाश्वत गोष्टी आणि कवितांचे बोलीभाषेत भाषांतर केल्यास ते कायमस्वरूपी वापरता येईल, हा विचार करून त्यांनी तसा प्रयत्न करून मसुदा तयार केला. शिक्षण अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली आणि पुस्तक प्रकाशित झाले. आज, कातकरी भागातल्या सुमारे १२०० शाळांत त्यांच्या पुस्तकाची मदत घेतली जाते. नव्याने येणाऱ्या शिक्षकांनाही मार्गदर्शिका खूपच उपयुक्त सिद्ध होत आहे, तर पहिल्यांदा शाळेत बसणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्याच भाषेत शिकवले जात असल्याची भावना निर्माण होऊन ते रोज शाळेत येण्यास तयार होतात. जाधव यांनी आपल्या मुलाचे शिक्षणही आदिवासी वाडीतील शाळेत केले.
संकलन : अरविंद पाटील