तरुणांनी आदर्श घ्यावा, असा विवाह सोहळा

स्वप्निल भालेराव (यिनबझ)
Friday, 10 May 2019

आधूनिक समाजात आजही आंतरजातीय विवाह हा गुन्हा मानला जातो. आंतरजातीय विवाह केला म्हणून नातेवाईक मुला मुलींना मारहाण करतात, त्यापुढे जाऊन हत्या करतात. ही क्रुर व्यवस्था मोडायची असेल तर आंतरजातीय विवाह केला पाहिजे

राज्यात सततचा दुष्काळ पडत आहे. आर्थिक टंचाई असली तरी कर्ज काढून भव्य लग्न करण्याकडे जनतेचा कल असतो. बहुतांश मंडळी लग्न थाटामाटात करतात. लग्नासाठी सभागृह, संगीतासाठी डीजे, बँड, फटाके, अतिषबाजी, रोषणाई, जेवणाचे अनेक पदार्थ, महागड्या निमंत्रण पत्रिका, कपडे, गिफ्ट अशा वस्तूंची काही गरज नसतांनाही काही मंडळी व्यर्थ खर्च करतात. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटते आणि कर्जाचा डोंगर वाढत जातो. शेवटी कर्ज फिटत नाही मग आत्महत्येता पर्याय समोर राहतो. राज्यात अशी गंभीर परिस्थिती असतांना आम्ही बडेजावपणा न करता नोंदणी पद्धतीने साधे लग्न केले. अशी माहिती निर्माता अक्षय इंडीकर व तेजश्री यांनी दिली. सकाळ मिडिया ग्रुपच्या 'यिनबझ'मध्ये बोलताना त्यांनी अनेक विषयांवर आपले मत मांडले.  
 

अक्षय व तेजश्री या तरुण दाम्पत्याने भंपक लग्नाला नकार देत अगदी साध्या पद्धतीने लग्न करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक  भान जपणारा तरुण निर्माता अक्षय इंडीकर आणि तेजश्री इंडीकर यांचा विवाह अक्षयतृतीयेच्या दिवशी नोंदणी पद्धतीने पुणे येथे संपन्न झाला. यावेळी दोन्ही कुटूबांतील मोजकेच नातेवाईक व मित्र उपस्थित होते. दोन हार, मणी मंगळसुत्र, मिठाई आणि विवाह नोंदणी असा सरासरी ५ हजार रुपये खर्च आला.
 

या विवाहाबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'उदाहरणार्थ नेमाडे' या पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शन केल्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राला माझी ओळख झाली. त्यानंतर 'अरण्य' हा सिनेमा अनेक देशांत दाखवण्यात आला. या निमित्ताने विविध देशांच्या संस्कृतीची माहिती मिळाली. भारतात सोने चांदीना खूप महत्व दिले जाते. लग्न समारभांत तर सोन्याला अधिकच महत्व प्राप्त होते. सोन्याचे घालून केलेले प्रदर्शन, तसेच खोट्या प्रतिष्ठेला आपण शाही लग्न समजतो. अशा लग्नाची चर्चा मिडीयातून सतत होत असते. हे सर्व टाळण्याचा प्रयत्न आम्ही केला.   
 

'उक्ती तशी कृती करत' अक्षय- तेजश्री यांनी आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहाबद्दल पुढे ते म्हणाले की, समाज कितीही आधुनिक झाला तरी 'जात' ही कायम टीकून आहे. समाजात रोटी व्यवहार केला जातो पण बेटी व्यवहार करताना जात पाहिली जाते. ही प्रथा मोडून काढली पाहिजे. आधूनिक समाजात आजही आंतरजातीय विवाह हा गुन्हा मानला जातो. आंतरजातीय विवाह केला म्हणून नातेवाईक मुला मुलींना मारहाण करतात, त्यापुढे जाऊन हत्या करतात. ही क्रुर व्यवस्था मोडायची असेल तर आंतरजातीय विवाह केला पाहिजे, असे ते म्हणाले. 
 

पाच वर्षापुर्वी माझ्या चित्रपटाचे काम चालू असतांना तेजश्रीची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि काही काळानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रथम आम्ही आर्थिक गणित सोडवली. नोकरी, व्यवसायात स्थिर झालो. विचार करुन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तेजश्री इंडीकर म्हणाल्या, आम्ही अंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे विरोध झाला. दोन्ही कुटुबांना समजविण्यात आम्हाला वेळ लागला. शेवटी सर्वांनी सहमती दिली. आम्ही भिन्न जातीचे असल्यामुळे दोघांच्याही रुढी परंपरेचा विचार न करता नोंदणी पद्धतीने साधा विवाह करण्याचे ठरवले. कुठलाही मानपान, जेवणाचा कार्यक्रम करायचा नाही. माझ्या घरी एकत्र कुटुंब असल्यामुळे आमचा परिवार मोठा आहे. आम्ही लग्नाचा सोहळा करावा, कमीत कमी एक छोटासा कार्यक्रम तरी ठेवावा अशी कुटुंबातील नातेवाईकांची ईच्छा होती. आम्ही आमच्या निश्चयावर ठाम होतो. साध्या पद्धतीने नोंदणी विवाह करुन आम्ही घरी गेलो. 

मी सध्या आकाशवाणी केंद्रात अधिकारी आहे. संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र भर भटकंती केली. अनेक गावांना भेटी दिल्या. मुला-मुलींचे आई वडील लग्नासाठी घर, शेती विकतात. कर्ज काढून हुंडा देतात, मानपान करतात आणि कर्जबाजारी होतात. असं तेजश्री यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलायाची असेल तर अक्षय- तेजश्री यांचा आदर्श तरुणाईने घेतला पाहिजे आणि अक्षय- तेजश्रीप्रमाणे विवाह करून समाजापुढे उदाहरण निर्माण केलं पाहिजे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News