'यशस्वी' होण्यासाठी दृढनिश्‍चय व अपयशातून शिकण्याची प्रवृत्ती आवश्‍यक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी, विशेषतः विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनामध्ये न बाळगता आपल्यासमोर उपलब्ध असणाऱ्या विविध करिअरविषयक संधींचा डोळसपणे विचार करावा. तसेच, पालकांनी डॉक्‍टर्स, इंजिनीअर्स एवढ्याच पुरते मर्यादित न राहता स्पर्धा परीक्षांमधून प्रशासकीय सेवा सेवेसाठीही पाल्यांना प्रोत्साहन द्यावे

पोलादपूर :  मानवी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी दृढनिश्‍चय, ध्येयनिश्‍चिती, सातत्यपूर्ण परिश्रम आणि अपयशातून शिकण्याची प्रवृत्ती आवश्‍यक असल्याचे मत रायगड जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी व्यक्त केले. सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे संस्थापक व माजी ग्रामविकासमंत्री दिवंगत प्रभाकर मोरे यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर, उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. स्नेहल कांबळे, क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी डॉ. रावेरकर यांनी, नॅक या देशातील सर्वोच्च मानांकन संस्थेकडून शाळेला तिसरे मानांकन मिळाले आहे. त्याची तपासणी करून घेण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व निकषांची पूर्तता महाविद्यालयाने केली असून, येत्या जानेवारीमध्ये महाविद्यालयाचे तिसरे मानांकन होणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली. 

महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पदक देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रभाकर गावंड, प्रा. डॉ. रवींद्र सोमोशी यांचा पीएच. डी पदवी प्राप्त केल्याबद्दल, तर डॉ. रावेरकर यांनी लंडन येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. 

भारतासारख्या विकसनशील देशाला खऱ्या अर्थाने विकसित देश व्हायचे असेल, तर महिलांच्या सर्वांगीण विकासाशिवाय ते शक्‍य होणार नाही. विद्यार्थिनींनी शिक्षण घेत असताना विविध शिक्षणपूरक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यावर भर द्यावा, असे सांगून डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी सातत्य, नियोजन, कठोर परिश्रम आणि अपयश आले, तरी त्यातून खचून न जाता त्यावर मात करण्याची प्रवृत्ती अंगी बाळगणे आवश्‍यक असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. 

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. रवींद्र सोमोशी यांनी सर्वांचे आभार मानले. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. स्नेहल कांबळे, प्रा. डॉ. रवींद्र सोमोशी, प्रा. सुदर्शन दवणे, प्रा. डॉ. राम बरकुले, तसेच क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधाकर जाधव, प्रा. शैलेश जाधव, कार्यालय अधीक्षक मुकुंद पंदेरकर आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News