‘या’ परिस्थितीत देखील विद्यार्थ्याने मिळवले यश; कुटुंबीयांच्या डोळ्यात तरळले अश्रू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • ऐन दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचा मृत्यू झाला.
  • त्यामुळे परीक्षेला बसावे की नाही, असा प्रश्‍न मनात घोळत असतानाच बापाने दिलेल्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याने सरळ परीक्षा केंद्र गाठले.

चेंबूर :- ऐन दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे परीक्षेला बसावे की नाही, असा प्रश्‍न मनात घोळत असतानाच बापाने दिलेल्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याने सरळ परीक्षा केंद्र गाठले. परीक्षा देऊन घरी आल्यानंतर वडिलांना अग्नी दिला. चेंबूरमधील संदेश साळवे या विद्यार्थ्याची ही कहाणी. दहावीच्या निकालात ५३.२० टक्के गुण मिळवत तो उत्तीर्ण झाला. तेव्हा तो दिवस आठवून आजी, आजोबा आणि आई आणि संदेशच्याही डोळ्यात पाणी आले.

चेंबूर टिळक नगर परिसरातील पंचशील नगर एसआरए इमारतीतील आठव्या मजल्यावर राहणारे परमेश्‍वर साळवे यांचे मार्चमध्ये कर्करोगाने निधन झाले. आपले आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांसह ते राहत होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले. त्याचदिवशी परमेश्‍वर यांचा मुलगा संदेशचा दहावीचा पेपर होता. एकीकडे घरात वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे परीक्षा अशा विचित्र मनस्थितीत असलेल्या संदेशने प्रथम दुःख बाजूला सारून दहावीचा पेपर देण्याचे ठरवले आणि परीक्षा केंद्र गाठले. परीक्षा देऊन आल्यानंतर कुटुंबांनी त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले होते.

पोलिस होण्याची इच्छा

संदेश आज दहावीत ५३.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने घरातील सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले. वडिलांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र याच्या जोरावरच मी दहावी पास झालो आहे. आता बारावी उत्तीर्ण होऊन पोलिस दलात भरती व्हायचे आहे, अशी इच्छा संदेशने व्यक्त केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News