मानखुर्दमध्ये वाढतेय अल्पवयीनांची स्टंटबाजी... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत हे अल्पवयीन, तरुण दुचाकीस्वार मानखुर्दच्या रस्त्यांवरून सुसाट दुचाकी चालवताना दिसत आहेत.

मुंबई : मानखुर्द परिसरात नोंदणी क्रमांक नसलेल्या दुचाकी धूमस्टाईल चालवणाऱ्यांमध्ये  तसेच सायकलवरून स्टंटबाजी करणाऱ्यांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत हे अल्पवयीन, तरुण दुचाकीस्वार मानखुर्दच्या रस्त्यांवरून सुसाट दुचाकी चालवताना दिसत आहेत. नोंदणी क्रमांकाची पाटीच नसल्यामुळे कारवाईची भीतीही त्यांना वाटत नाही. त्यांच्या या धोकादायक स्टंटमुळे मात्र, वाहनचालकांसह पादचाऱ्यांचाही जीव टांगणीला लागतो.

मानखुर्दमध्ये पीएमजीपी वसाहत, मंडाला झोपडपट्टी तसेच घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर अल्पवयीन, तसेच तरुण धूमस्टाईल दुचाकीची रपेट मारताना सध्या मोठ्या संख्येने दिसतात. हे तरुण हेल्मट घालत नाहीत, नोंदणी क्रमांकाच्या पाटीशिवाय तसेच ट्रिपल सिट भरधाव वेगाने वाहन चालवतात. त्यांच्या दुचाकींमध्ये बऱ्याचदा बदलही करण्यात आलेले असतात. दुचाकींचे सायलेन्सरही काढलेले असतात. त्यामुळे नंतर त्यांची ओळख पटवणे शक्‍य नसते. तसेच, कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणदेखील होते.

हे तरुण गर्दीचीही पर्वा न करता गर्दीतूनही सुसाट दुचाकी चालवतात. अल्पवयीन सायकलस्वारदेखील वर्दळीच्या रस्त्यावर स्टंटबाजी करत आहेत. अशाप्रकारे ते स्वतःच्या जीवासोबत पादचाऱ्यांचाही जीव धोक्‍यात घालतात. परिसराची माहिती असल्यामुळे वाहतूक पोलीस उभे असलेली ठिकाणे टाळण्याची खबरदारी ते घेतात.  त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास ते अरेरावी करत उद्धटपणे वागतात. त्यामुळे नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News