भरलेली वांगी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020

 लहान ते मध्यम आकाराची काटेरी वांगी 

साहित्य:
 लहान ते मध्यम आकाराची काटेरी वांगी 
१ लहान = कांदा बारीक चिरलेला
२ मध्यम आकाराचे टोमॅटोबारीक चिरलेले
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जिरे
पाव टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
१० -१२ कढीपत्ता
तेल
१ कप =  किसलेले सुके खोबरे
१ लहान कांदा = बारीक चिरलेला
३ टेबलस्पून शेंगदाणे
पाव कप कोथिंबीर बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या
१ इंच आल्याचा तुकडा
१०-१२ लसणीच्या पाकळ्या
२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
१ टीस्पून धणे पावडर
दीड टेबलस्पून काळा मसाला 
२ टेबलस्पून पांढरे तीळ
१ टेबलस्पून कारळे

कृती:
सर्वप्रथम वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊ. शेंगदाणे मध्यम आचेवर करड्या रंगावर खरपूस भाजून घेऊ. साधारण ३ ते ४ मिनिटे लागतात . एका ताटलीत काढून घेऊ.त्याच तव्यात पांढरे तीळ भाजून घेऊ. २ ते ३ मिनिटांत तीळ खरपूस भाजून झाले की कारळे भाजावे. कारळे भाजले गेले की त्यांचा रंग थोडा फिकट होतो , एका ताटलीत काढून घ्यावेत. त्यानंतर सुके खोबरे चांगले करड्या रंगावर भाजून घ्यावे. 

भाजलेले शेंगदाणे थंड झाले की त्यांच्या साली काढून जाडसर कूट करावा ( पाणी घालू नये ) .एका मिक्सरच्या भांड्यात बाकीचे भाजलेले घटक पदार्थ जसे की तीळ, कारळे आणि खोबरे घालावे. त्यातच एक चिरलेला कांदा , हिरव्या मिरच्या , आले, लसूण आणि कोथिंबीर ( कोवळ्या देठांसकट घालावी , छान सुगंध येतो मसाल्याला ) घालून , पाव कप पाणी वापरून बारीक दाटसर मसाला वाटून घ्यावा .हा वाटलेला मसाला एका मोठ्या वाडग्यात काढून घ्यावा. त्यात धणे पावडर, लाल मिरची पूड, आणि काळा मसाला घालावा. चवीप्रमाणे मीठ घालावे आणि छानपैकी एकत्र करून घ्यावे. हा मसाला आपल्याला वांग्यात भरायचा आहे. वांगी मिठाच्या पाण्यातून बाहेर काढावी . वांगी देठासकट ठेवावीत , चविष्ट लागतात . मसाला वांग्यांत दाबून भरावा , परंतु वांग्याचे तुकडे पडू देऊ नयेत . सारी वांगी भरून झाली की उरलेला मसाला आपण वांग्याच्या रस्स्यात घालू.

एका कढईत ३ ते ४ टेबलस्पून तेल गरम करावे . गरम तेलात मोहरी, जिरे , हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा घालून तो चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा . साधारण ४ ते ५ मिनिटांत कांदा मऊ होतो. आता टोमॅटो घालून घेऊ. हळद व थोडे मीठ घालावे जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतात. मीठ घालताना जपून घालावे कारण आपण वांग्याच्या मसाल्यात देखील मीठ घातले आहे. झाकण घालून मंद आचेवर टोमॅटो शिजू द्यावेत.साधारण ६ मिनिटे झाकून शिजवल्यावर टोमॅटो मऊ होतात. आता भरलेली वांगी घालून मिसळून घ्यावीत. मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून ते पाणी कढईत घालावे. मंद आचेवर झाकण घालून ४-५ मिनिटे शिजू द्यावीत.

वांगी थोडी शिजून मऊ होतात आणि पाणी ही सुटते. आता उरलेला मसाला घालावा , नीट एकत्र करून घ्यावा.साधारण दीड कप गरम पाणी घालून रस्सा तयार करावा. आपल्याला हवा तास पातळ किंवा घट्ट रस्सा ठेवावा. हा रस्सा मोठ्या आचेवर उकळू द्यावा. आच मंद करून झाकण घालून वांगी पूर्ण शिजू द्यावी.

१० मिनिटांनंतर वांगी शिजली आहेत की नाही हे पाहावे. सारी वांगी शिजली नसतील तर परत झाकण घालून अजून ५ मिनिटे शिजू द्यावीत.
वांगी शिजली की रस्साही थोडा घट्ट होतो , आता त्यात शेंगदाण्याचा कूट घालून मिसळून घ्यावा. हलक्या हाताने मिसळावा नाहीतर वांगी तुटतात.
 झणझणीत काळ्या मसाल्यातली भरली वांगी तयार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News