अधिकारी घडवणारी अभ्यास गल्ली पार्किंगच्या विळख्यात

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Friday, 14 February 2020
  • प्रशासनाचा अजब कारभार: वाहने हटविण्याऐवजी "नो पार्किंग" बोर्ड हटवला

मुंबई : लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी 'अभ्यास गल्ली' सध्या अवैध्य वाहनांच्या पार्किंगमुळे अडचणीत आली आहे. वरळी येथील पोदार रुग्णालयाच्या मागून एक रस्ता जातो. बाजूला रुग्णालये असल्यामुळे रस्त्यावर शांतता प्रतिबंधत क्षेत्र आणि नो पार्कींग झोन नावाचे फलक लावण्यात आले होते. रस्त्यावर शांतता असल्यामुळे अनेक विद्यार्थी रस्त्याच्या बाजूला अभ्यास करण्यासाठी  बसतात. त्यामुळे सध्या 'अभ्यास गल्ली' म्हणून हा रस्ता प्रसिद्ध आहे. अनेक विद्यार्थी येथे अभ्यास करुन डॉक्टर, इंजिनिअर, वकील, मोठे अधिकारी झाले आहेत.

 सध्या शाळा, महाविद्यालय आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास गल्लीचा वापर करतात. मात्र, अभ्यास गल्ली समोर नो पार्कींग झोन असतानाही वाहने पार्कींग करत असल्यामुळे अर्धा रस्ता वाहनांनी व्यापला आहे. सतत वाहनांचा आवाज विद्यार्थ्यांच्या कानावर पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे  मन विचलीत होते. महानगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना वाहनांखाली जागा स्वच्छ करता येत नाही. वाहनाखालच्या अस्वच्छतेमुळे दुर्गंधी सुटते, मच्छरांची पैदास होते. अभ्यास करतांना ही मच्छर विद्यार्थांच्या अंगावर जाऊन बसतात आणि त्रास देतात. तसेच वाहनांचा आडोसा घेऊन गर्दुले अभ्यास गल्लीत मद्य पार्टी करतात तर काही चोर वाहनांच्या मागे लपून रोलींग चोरतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण जात आहे.

 

वाहने हटवण्याऐवजी नो पार्किंग बोर्ड हटवला

नो पार्कींग झोनमधील वाहने हटवून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी रस्ता मोकळा करुन द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या शिष्ट मंडळाने वरळी वाहतूक शाखेला निवेदनाद्वारे केली होतीे. मात्र पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट वाहतूक शाखेला निवेदन दिल्यानंतर एका दिवसात 'नो पार्कींग'चा बोर्ड हटविण्यात आला. त्यामुळे वाहने बिनधास्तपणे पार्किंग करत आहेत. याचा मनस्ताप अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
 

वरळी येथील पोदार गल्लीची ओळख ‘अभ्यास गल्ली’ म्हणून प्रसिद्ध आहे. कठोर मेहनत आणि स्वप्नातलं ध्येय साध्य साकार करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास गल्ली वरदान आहे. अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळत असल्यामुळे दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, सी. ए, एम.बी.ए, स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी गल्लीत येतात मात्र, काही लोकांनी अभ्यास गल्लीची वाट लावली आहे. गर्दुल्यांनी उपद्रव माजवला आहे. उपद्रवी लोकांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा आणि अभ्यास गल्ली विद्यार्थ्यांसाठी मोकळी करावी
-
तेजेस जेस्वाल, विद्यार्थी

सूर्य मावळून अंधाराचे साम्राज्य पसरताच येथे विद्यार्थी जमू लागतात. घरातील कुटुंबाच्या गोंधळापासून शांत ठिकाणी अभ्यास गल्लीत विद्यार्थी जमतात. परंतु, सततच्या त्रासदायी वाहनांच्या आवाजामुळे या गल्लीतील शांतता भंग होत आहे. बेकायदा वाहनांच्या पार्किंमुळे बीएमसी सफाई कर्मचाऱ्यांना कायम त्रास सहन करावा लागतो. पार्किंगच्या गाड्यांमुळे कचरा काढण्यास अडचणी येतात, त्यामुळे इकडे मच्छरांचा स्तोम माजतो. मात्र, या मच्छरांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. याठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई असताना वारंवार काही लोक धूम्रपान करतात. त्यांच्यावर कोणीही कारवाई होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो, परिणामी अभ्यासात दुर्लक्ष होते.
केतन शेटगे,  विद्यार्थी

नो पार्कींगमध्ये वाहन लावणाऱ्या 30 चालकांवर कारवाई केली आहे. 'अभ्यास गल्ली'त मध्ये नो पार्कींगचे बोर्ड नाहीत. त्यामुळे वाहनांवर कारवाई करता येत नाही. बीएमसी महानगरपालिकेला अभ्यास गल्लीत 'नो पार्कींग बोर्ड' लावण्यासाठी पत्र दिले आहे. महानगरपालिकेनी 'नो पार्कींग' बोर्ड लावल्यानंतर सर्व वाहनचालकांवर कार्यवाही केली जाईल.
-
संदेश मोरे, ड्युटी अधिकारी, बीडीडी चाळ, वाहतूक शाखा वरळी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News