विद्यार्थांना मिळणार सराव प्रश्न..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020
  • अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.
  • त्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला घेण्यात येणार आहेत.
  • परंतु या विद्यार्थांसाठी विद्यापीठाने एक नविन निर्णय घेतला आहे.

मुंबई :- अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. त्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला घेण्यात येणार आहेत. परंतु या विद्यार्थांसाठी विद्यापीठाने एक नविन निर्णय घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची सूचना कुलगुरूंना दिली असली, तरी विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी मात्र प्रश्नसंच नाही तर त्याबदल्यात सराव प्रश्न देण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नांचे स्वरूप कळण्यासाठी सराव प्रश्न देण्यात येणार असल्याचे विद्यापीठांनी जाहीर केलेल्या सुधारित नियमावलीत नमूद करण्यात आली आहे.

विद्यापीठांनी परीक्षांचे स्वरूप जाहीर केल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी परीक्षेपूर्वी प्रश्नसंच देऊन त्यातील प्रश्न विचारण्याची मागणी केली. त्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देण्याच्या सूचना विद्यापीठांच्या कुलगुरूंनी दिल्या. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्न देण्यात येतील असे सुधारित नियमावलीत स्पष्ट केले आहे.

विद्यापीठाने परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांच्या समूहावर सोपवली आहे. प्रत्येक महाविद्यालयाला परीक्षेसाठी प्रश्नसंच तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. हे  प्रश्नसंच महाविद्यालयाकडेच राहणार आहेत. त्यावर आधारीत परीक्षा घेण्यात येणार आहे. पण, परीक्षेचे स्वरूप बदलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात यावे यासाठी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. या सराव प्रश्नपत्रिकेतील प्रश्नच परीक्षेत विचारण्यात येतील असे नाही. परीक्षेसाठी १३ मार्चपर्यंत शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात येतील. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी देण्यात येणारी प्रश्नपत्रिका ही फक्त सरावासाठी आणि प्रश्नांचे स्वरूप कळण्यासाठी असेल, असे एका प्रमुख महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

विद्यार्थ्यांत संभ्रम

अंतिम वर्षांच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. या स्थितीत विद्यापीठ परिपत्रक काढते, त्यानंतर मंत्रालयाकडून वेगळी घोषणा केली जाते. पुन्हा विद्यापीठांना स्पष्टीकरण देते, असा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत संभ्रम देखील वाढत आहे.

‘न्यायालयाचा आदर म्हणून अंतिम वर्षांच्या परीक्षांना मंजुरी’

न्यायालयाचा आदर म्हणून या परीक्षा घेतोय. परंतु, अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द कराव्यात याच मतावर  ठाम असल्याचे स्पष्ट मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या तयारीबाबत आढावा बैठकीनंतर  सामंत यांनी संवाद साधला. जेईई आणि नीटसारख्या परीक्षा सुरक्षेचे सर्व नियम पाळून नियमित पद्धतीने होत असताना विद्यापीठीय परीक्षांच्या नावावर केवळ औपचारिकता का, असा सवाल केला असता सामंत म्हणाले,  या परीक्षा एका दिवसाच्या असतात. तसेच करोनाचे राज्यातील वाढते संक्रमण बघता अशा काळात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही.

महाविद्यालयांकडून परीक्षा शुल्काची मागणी

विद्यापीठाने परीक्षा महाविद्यालयांकडे सोपवल्या आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांकडून परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम महाविद्यालये विद्यापीठांना देतात. सद्यस्थितीत परीक्षांचे नियोजन, प्रश्नपत्रिका काढणे अशी सर्व कामे महाविद्यालये करत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सुविधांचा खर्च ही महाविद्यालये करत आहेत. त्यामुळे विद्यापीठाला दिलेले ६० टक्के परीक्षा शुल्क महाविद्यालयांना परत दिले जावे, अशी मागणी अशासकीय महाविद्यालयांच्या संघटनेने केली आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News