युजीसीच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटना उच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020
  • कोरोनाचा धोका वाढत असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या युजीसी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटना आणि विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई :- कोरोनाचा धोका वाढत असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या युजीसी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटना आणि विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या सर्व विद्यापीठ परीक्षा घेण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. या दोन्ही निर्णयांना आज महाराष्ट्र स्टुडंटस युनियन आणि विधी शाखेच्या पाच विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे विरोध केला आहे. अविरुप मंडल, ओमकार वाबळे, तेजस माने, स्वप्नील ढगे, विशाल शिरसाट आणि सुरभी अगरवाल आदी नऊ विद्यार्थ्यांनी ऍड. यशोदीप देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला आहे. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र या निर्णयाला पुण्यातील निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ऍड्‌. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. या याचिकेत बाजू मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. आज मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्यायालयाने विद्यार्थ्यांचा अर्ज सुनावणीसाठी मंजूर केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा संख्या वाढत आहे, त्यामुळे परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती अर्जदारांनी व्यक्त केली आहे.

३१ जुलैपर्यंत सुनावणी तहकूब

राज्य सरकारनेही परीक्षा घेण्यासाठी विरोध व्यक्त केला आहे. बिगरव्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा घेण्यासाठी मनाई केली असून व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा ही रद्द करण्याची शिफारस सर्वोच्च मंडळाला केली आहे, असे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले. युजीसीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी प्रतिज्ञापत्र दखल करण्यासाठी अवधी मागितला. न्यायालयाने शुक्रवारी याचिकादारांना सरकारच्या भूमिकेवर बाजू मांडण्याचे निर्देश दिले असून सुनावणी ३१ जुलैपर्यंत तहकूब केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News