ऑनलाइनच्या घोळात अडकली विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक असणारे उत्पन्न, रहिवासी, वय, अधिवास, जात, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र महसूल विभागाकडून दिले जातात.

चाकूर - महसूल विभागाकडून दिले जाणारे जात आणि नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी महाऑनलाइनने एक जूनपासून ऑनलाइन पद्धत वापरण्यास सुरवात केली असून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे, तीन वर्षांपासून असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी दहावी व बारावीचे निकाल लागण्याच्या काळातच करण्यात आल्यामुळे आठ दिवसांपासून जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक असणारे उत्पन्न, रहिवासी, वय, अधिवास, जात, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र महसूल विभागाकडून दिले जातात. २०१५ च्या शासन निर्णयानुसार ही सर्व प्रमाणपत्रे ऑफलाइनऐवजी ऑनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीने द्यावे असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लातूर जिल्ह्यात जात व नॉन क्रिमीलेअर वगळता सर्व प्रमाणपत्रे महाऑनलाइन पोर्टलवरून ऑनलाइन दिली जात आहेत. एक जूनपासून ही दोन प्रमाणपत्रे ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय अचानकपणे महाऑनलाइनने घेतला आहे.

यामुळे सर्व यंत्रणा खोळंबली असून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळत नसल्याची स्थिती आहे. ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी तहसील स्तरावर नायब तहसीलदार, तहसीलदार यांनी कागदपत्रांची तपासणी करावयाची असून यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जात व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळणार आहे. अधिकाऱ्यांना महाऑनलाइनकडून ऑफलाइन बंद करून ऑनलाइन चालू करावे, याबाबत कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. तहसील स्तरावरील अधिकाऱ्यांना त्यांचा लॉगीन आयडी अद्यापही मिळालेला नाही.

यामुळे कागदपत्रांची तपासणी करता येत नाही. सध्या दहावी व बारावीचे निकाल लागल्यामुळे पुढील प्रवेशासाठी ही दोन प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहेत, याच काळात महाऑनलाइने घातलेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तहसील कार्यालयातील सेतू सुविधा, आपले सरकार केंद्रावरून सध्या सदरील प्रमाणपत्रे काढून दिले जात नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून सध्या ऑफलाइन पद्धतीने जात व नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News