विद्यार्थ्यांनी परावलंबी न राहता जिद्दीने अभ्यास करावा : अरुण अडसूळ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

आजच्या तरुणाईला योग्य दिशा देणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांनी परावलंबी न राहता जिद्दीने अभ्यास करून या भूतलावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला हवे. तसेच, नैतिक मूल्यांचा पुरस्कार करून समाजसेवाही करायला हवी,
- माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी केले.

औंध : ‘आजच्या तरुणाईला योग्य दिशा देणे गरजेचे असून, विद्यार्थ्यांनी परावलंबी न राहता जिद्दीने अभ्यास करून या भूतलावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला हवे. तसेच, नैतिक मूल्यांचा पुरस्कार करून समाजसेवाही करायला हवी,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी केले. औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ झाला, त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, परीक्षा विभागप्रमुख डॉ. तानाजी हातेकर आदी उपस्थित होते. माजी महापौर गायकवाड म्हणाले की, पदवीग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांनी सचोटी, हातोटी आणि कसोटी या तीन गुणांचा अंगीकार करून पुढील वाटचाल करावी.

प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे प्रास्ताविकात म्हणाले, ‘महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामुळे बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली झाली. विद्यार्थ्यांना मिळालेल्या पदवीचा त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी वापर करावा. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकणारा विद्यार्थी तयार व्हावा, यासाठी रयत शिक्षण संस्था कार्य करत आहे.’

महाविद्यालयातून बीए, बीबीए, बीकॉम अशा विभागांतून पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील ८३ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय नगरकर यांनी केले. डॉ. तानाजी हातेकर यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News