बसफेऱ्या बंद झाल्याने विद्यार्थी, प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • सावदा परिसरात नाराजी; उत्पन्न घटल्याने घेतला निर्णय
  • यावल आगारातील असंख्य बस फेऱ्या बंद असून काही रावेर आगारातील असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

सावदा - परिसरातील विशेषतः ग्रामीण भागातील असंख्य बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांसह पासधारक विद्यार्थ्यांना तसेच लग्न सोहळ्यास ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यासंदर्भात रावेर आगाराचे बस टाइमकिपर चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी कमी उत्पन्नाचे कारण दर्शवून उडवाउडवीची उत्तरे देत फोन बंद केला.

सावदा येथून परिसरातील अनेक गावांमध्ये नियमित बसफेऱ्या पूर्वी सुरू होत्या. कमी उत्पन्नाचे कारण दर्शवून बस बंद झाल्याने आगाऊ तीन महिन्यांचे पास घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जा-ये करता येत नाही. तसेच ग्रामस्थ, शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी खासगी तथा शासकीय कामासाठी तसेच लग्नसराई जाणे येण्यासाठी खूपच हाल होत आहेत. यामुळे खाजगी प्रवासी वाहनातून जास्तीचे पैसे देत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची चलती होत असून रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी डांबून भरत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. सावदा येथून रावेर व यावल तालुक्यात ग्रामीण भागात जाणाऱ्या असंख्य बसेस बंद करण्यात आल्या आहे.

यावल आगारातील असंख्य बस फेऱ्या बंद असून काही रावेर आगारातील असल्याचे चौधरी यांनी सांगितले. बसेस बंद झाल्याने तीन-तीन महिन्याच्या पास धारकांना हकनाक आर्थिक फटका सहन करून भर उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. तर दैनंदिन कामकाजासाठी जाणे-येणे त्रासदायक बनले आहे. तरी या बसेस पूर्ववत सुरू व्हाव्या, अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.
बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या

फैजपूर-निंभोरा, निंभोरा - फैजपूर, फैजपूर- मस्कावद- रावेर, रावेर-न्हावी, न्हावी- चिनावल- रावेर. शेडूल क्रमांक ६४ मधील फैजपूर- रावेर, रावेर- न्हावी, न्हावी- चिनावल, चिनावल - न्हावी, न्हावी - बालवाडी, बालवाडी ते न्हावी, बालवाडी- फैजपूर- रावेर आदी तसेच सकाळी सुटणारी ५.४५ ची सावदा- यावल बस, ७.५० ची यावल- लोहारा, परतीत लोहारा- यावल, सकाळी ९.४० ची फैजपूर- जानोरी, परतीत जानोरी- फैजपूर, दुपारी ४.३० ची फैजपूर- जानोरी, परतीची जानोरी - फैजपूर, सकाळी ६ ची वरणगाव फॅक्टरी, ७.१० ची थोरगव्हाण- फैजपूर, १२.३० ची फैजपूर- थोरगव्हाण, दुपारी १.५०ची थोरगव्हाण, ४.३०ची फैजपूर- तांदलवाडी, ६.१० ची फैजपूर- चिनावल, सकाळी ७.३०ची फैजपूर- दसनुर तसेच सकाळी ९.१० ची फैजपूर- सुनोदा आदी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News