नागपूर :- संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटाचे प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळेच महाराष्ट्रात मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले. तेव्हापासून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. सर्व परीक्षा रद्द केल्या. परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने घेतला आहे. सहा महिने चाललेल्या नाटयमय घडामोडींनंतर विद्यापीठांनी आखलेले अंतिम वर्षांचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे. पुणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नागपूर, अमरावती विद्यापीठांनी १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा संप, प्रवेश परीक्षा घेणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांबरोबर समन्वयाचा अभाव यामुळे आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या वाटयाला मनस्ताप आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पूर्वनियोजनानुसार १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होत्या. अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या काळात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) यूजीसी नेट आणि राज्यसेवा परीक्षा या परीक्षाही होणार होत्या. त्यामुळे विद्यापीठाने १२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अंतिम वर्ष परीक्षा बहुपर्यायी आणि ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने त्यासाठी प्रश्नसंच तयार करण्याचेही काम सुरू आहे. जवळपास तीन हजारांहून अधिक विषयांचे प्रश्नसंच तयार करावे लागत आहेत. त्यालाही थोडा वेळ लागणार असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा १ ऑक्टोबरपासून सुरु होणे अपेक्षित होते. पण, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविद्यालयातील कर्मचारी कामावर नाहीत. परिणामी महाविद्यालयांकडून मंगळवापर्यंत विद्यार्थ्यांना ओळखपत्र देता आले नाही. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्याही अंतिम वर्षांच्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. पण, अपरिहार्य कारणास्तव परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केले. गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु, कर्मचारी संपामुळे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे या विद्यापीठाच्या परीक्षाही अडचणीत असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मनस्ताप
सहा महिने परीक्षा होणार की नाही, या संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षांची वेळापत्रके जाहीर झाल्यावर तयारी सुरू केली. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. नव्याने परीक्षा कशा, कधी होणार याबाबत अनेक विद्यापीठांनी अद्याप चित्र स्पष्ट केलेले नाही.
प्रवेश परीक्षांचेही वेळापत्रक बदलले
प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकत्रित येत असल्याने वेळापत्रक बदलल्याचे कारण विद्यापीठांनी दिले. पण, आता प्रवेश नियमन प्राधिकरणानेही अनेक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात बहुतेक पदव्युत्तर आणि पदवी प्रवेश परीक्षा होणार आहेत. आता विद्यापीठांनीही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
आयोगाचे वेळापत्रक बासनात?
विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्यासाठी राज्याला मुदतवाढ देतानाच परीक्षेचे निकालही ३१ ऑक्टोबपर्यंत जाहीर करण्याची सूचना दिली होती. नवे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून आणि महाराष्ट्रासाठी १८ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचीही सूचना केली. नव्या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रकही जाहीर केले. परंतु, आता परीक्षा पुढे ढकलल्यामुळे या वेळापत्रकाप्रमाणे राज्यातील शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई विद्यापीठावर परिणाम नाही
कर्मचारी संपाचा फटका राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षांना बसला असली तरी अद्याप मुंबई विद्यापीठावर फारसा परिणाम झालेला नाही. विद्यापीठाने परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवली आहे. त्यामुळे परीक्षा होतील. परंतु, आंदोलन लांबल्यास निकालाच्या कामावर परिणाम होऊ शकेल, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.