मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांची पाठ 

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 27 February 2019

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाकडे दरवर्षी विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षांपासून घटत चालली आहे; तर पदविका अभ्यासक्रमाला गेल्या दोन वर्षांपासून एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नसल्याने हा अभ्यासक्रमही बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाकडे दरवर्षी विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांची संख्या गेल्या दोन वर्षांपासून घटत चालली आहे; तर पदविका अभ्यासक्रमाला गेल्या दोन वर्षांपासून एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला नसल्याने हा अभ्यासक्रमही बंद होण्याच्या मार्गावर आहे. 

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रम राबविण्यात येतात. या अभ्यासक्रमानंतर अनेक विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात. 2014-15 या वर्षी मराठी विभागात 106 विद्यार्थी शिक्षण घेत होते. हे प्रमाण गेल्या तीन वर्षांपासून घटत चालले आहे. त्यामुळे भविष्यात या विभागाला विद्यार्थी मिळणे दुरापास्त होणार आहे. 

विद्यापीठात मराठी, पाली, रशियन, अरेबिक, गुजराथी, उर्दू, पर्शियन, फ्रेंच, इंग्रजी, संस्कृत, सिंधी, कन्नड, हिंदी, आफ्रिकन स्टडीज, जर्मन या भाषा शिकवल्या जात आहेत. 2014-15 या वर्षात जर्मन भाषेसाठी एक हजार 533 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. पुढील दोन वर्षे या भाषेसाठी सुमारे 1100 विद्यार्थी प्रवेश घेत होते. मात्र, 2017-18 या शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमाच्या प्रवेशात मोठी घट होऊन केवळ 68 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. 

अरेबिक, पाली, संस्कृत भाषेला सध्या विद्यापीठात चांगले दिवस आले आहेत. या भाषेचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी विद्यार्थीसंख्या वाढत आहे. 2014-15 या वर्षात 458 विद्यार्थ्यांनी अरेबिक भाषेला प्रवेश घेतला होता. पाली भाषेला 2014-15 मध्ये 197, 2015-16 ला 234, 2016-17 ला 267 आणि 2017-18 या वर्षात 319 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. 

राज्य सरकारचे दुर्लक्ष 
मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकार कोणतेही धोरण ठरवताना दिसत नाही. त्यामुळे मराठी भाषेचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत नाहीत. स्पर्धेमध्ये मराठी भाषेचे शिक्षण घेणाऱ्या मुलांना संधी उपलब्ध होत नसल्याने मुले इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. मराठी भाषेसाठी सरकारचे कोणतेही धोरण नसल्याने मराठीची उपेक्षा होत असल्याचे विद्यापीठातील एका प्राध्यापकाने सांगितले. 

करिअरच्या अनेक संधी 
मराठीतून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मास मीडिया, ब्लॉग लिहणे, मुद्रितशोधक, डीटीपी, मराठी मालिका, कथा, पटकथा लिहिणे अशा विविध क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. 

बोलीभाषा टिकवली पाहिजे 
इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे बोलीभाषा कमी बोलली जात आहे. व्यवहारात भाषेचे प्रमाण वाढले पाहिजे. मराठी विषयाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मिळत नसल्याचे बोलले जाते; मात्र हे असत्य आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होत आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला आहे. त्यामुळे केवळ मराठीच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत, असे बोलणे योग्य नाही. 
- भारती निरगुडकर, माजी मराठी विभागप्रमुख, मुंबई विद्यापीठ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News