सर्दी, ताप, खोकला असल्यास विध्यार्थी व शिक्षकांना सुट्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

शाळेत येणाऱ्या मुलांना सर्दी ताप, खोकला झाला असल्यास त्यांना सुट्टी द्यावी. असा आदेश मंगळवारी बजावला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही अशा प्रकारचा त्रास असल्यास सुटीवर जाण्यास सांगण्यात आले आहे.

बेळगाव: कोरोनाची भिती आता सर्वत्र पसरू लागली असून शिक्षण खात्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळेत येणाऱ्या मुलांना सर्दी ताप, खोकला झाला असल्यास त्यांना सुट्टी द्यावी. असा आदेश मंगळवारी बजावला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही अशा प्रकारचा त्रास असल्यास सुटीवर जाण्यास सांगण्यात आले आहे.

शिक्षण खात्याने मंगळवारी अधिकृत पत्रक जाहीर करीत राज्यातील सर्व सरकारी अनुदानित व विनाअनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्दी, ताप, खोकला असल्यास त्यांना सुटी देण्यात यावी असे कळविले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोनामुळे भितीचे वातावरण पसरले असून देशाच्या काही भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे ही स्वाईन फ्लू सारखी असून सर्दी, खोकला, ताप यापासून या रोगाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळेच सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना सुट्टी घेण्यापासून रोखू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यांचा आजार कमी झाल्यानंतरच त्यांना पुन्हा शाळेत येण्याची सूचना करावी. तसेच विद्यार्थी वस्तीगृहात किंवा इतर ठिकाणी राहून शिक्षण घेत असल्यास आणि त्या विद्यार्थ्याला सर्दी, ताप झाला असल्यास त्याच्यासाठी विशेष खोलीची सोय करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनी स्वच्छ हात धुवावेत. तसेच सर्दी, ताप आल्यास तातडीने डॉक्‍टरांशी संपर्क साधावा. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करावे अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. सध्या परिक्षांचा मोसम सुरू झाला असून विद्यार्थी परिक्षेच्या तयारीत आहेत. अशावेळी सर्दी, ताप, खोकला असल्यास सुट्टी देण्यास सांगण्यात आल्याने काही विद्यार्थ्यांसाठी अडचण ठरणार आहे. मात्र, शिक्षण खात्याने या रोगाची लागण होऊ नये यासाठी काय करावे? आणि काय करू नये? याची मार्गदर्शक सूचीच जाहीर केली आहे.

शिक्षण खात्याने मंगळवारी सायंकाळी याबाबत अधिकृत पत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व शाळांना माहिती देण्यात येणार असून आपल्या भागात असा कोणताही रुग्ण नसला तरी खबरदारी म्हणून शिक्षण खात्यातर्फे सर्दी, ताप असलेल्या विद्यार्थ्यांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News