विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक - प्रवीण दराडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 August 2020

सामाजिक न्याय खात्याने शिक्षणासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले असून भविष्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साडेतीनशे क्षमतेचे वस्तीगृह उभारण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. तसेच पुणे आणि मुंबई विद्यापीठात 1000 क्षमतेचे वस्तीगृह सुरू करण्याबाबतचा विचारही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासंदर्भात दूरदर्शनच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील, 

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक - प्रवीण दराडे

महाराष्ट्र - राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात ज्या अडचणी आहेत, त्या अडचणीचे निराकरण लवकरात लवकर होईल, अशी माहिती राज्याचे समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिली. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम आणि संविधान फाउंडेशनच्या वतीने अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी 2020- 21 मध्ये बजेटची उपलब्धता आणि कोविड -19 काळात शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी या विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष इ. झेड. खोब्रागडे हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दराडे यांनी सामाजिक न्याय विभाग कोविड च्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे काम करत आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. विशेषत: विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, स्कॉलरशिप, फ्रीशिप, वसतिगृह,रमाई घरकुल, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना,  या योजनांसाठी शासनाकडून निधी लवकरात लवकर  उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा चालू असून या खात्याचे मंत्री मा. धनंजय मुंडे यांनी सुद्धा हा विषय  प्राधान्याने हाती घेतला आहे. त्यामुळे जसा निधी उपलब्ध होईल तसे विद्यार्थ्यांचे व योजनांच्या लाभार्थींची प्रश्न सोडवल्या जातील, असे दराडे म्हणाले.

सामाजिक न्याय खात्याने शिक्षणासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले असून भविष्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साडेतीनशे क्षमतेचे वस्तीगृह उभारण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. तसेच पुणे आणि मुंबई विद्यापीठात 1000 क्षमतेचे वस्तीगृह सुरू करण्याबाबतचा विचारही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासंदर्भात दूरदर्शनच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील,   वसतिगृहातील विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न आहेत. स्वाधर योजनेतील त्रुटी दुरुस्त करून महापालिका क्षेत्रातील पाच किलोमीटरच्या बाहेरील विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले,. सामाजिक न्याय विभाग हा अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून शासनाच्या सर्व योजनांसाठी सकारात्मक दृष्टीने पावले उचलली जातील, यासाठी समाजातील सर्व गटातील लोकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही ते  म्हणाले. कोविड मुळे निधीची थोडीशी उपलब्धता कमी आहे, पण हा प्रश्न लवकरच सुटेल, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी इ.झेड. खोब्रागडे यांनी  वेबिनार मागील भूमिका स्पष्ट करताना, विविध प्रकारच्यास्कॉलरशिपच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही, स्कॉलरशिपमध्ये वाढ व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे त्यासाठी आमचा पाठपुरावा  चालू आहे. केंद्र सरकारच्या भारत सरकार स्कॉलरशिप संदर्भातील 2018 च्यागाईडलाईन्स राज्याने लागू केल्या नाहीत, लागू करून अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. योजना  अंमलबजावणीतील उणिवा व उपाययोजना बाबत दिनांक 15 मार्च2020 ला मान मुख्यमंत्री यांचे सोबत बैठकीत चर्चा झाली .काही मागण्या केल्यात त्याबाबत कार्यवाही करून योजनांतील समस्या  दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे समाज कल्याण विभाग सुरू झाला आहे, म्हणून या विभागाचे महत्त्व अधिक आहे. त्यासाठी या विभागाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण सामाजिक न्याय विभागामध्ये संचालक असताना अनेक नवीन उपक्रम सुरू केले होते. दिनांक 17 फेब्रुवारी2010 चे व्हिजन डॉक्युमेंट  मंत्री परिषदेने मान्य केले आहे. त्यातील काही योजना आता सुरू आहेत. आणखी त्यातील काही योजना प्रलंबित आहेत, त्या सुरू कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिक्षणाच्या योजनाकडे,शिष्यवृत्ती, फीमाफी, स्वाधार, वसतिगृह ,इत्यादी कडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे व यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषता काहींनी आपल्या अडचणी आयुक्तांसमोर मांडल्या. त्यामध्ये डॉ. एन. जे. मेश्राम,प्रा., प्रकाश पवार, सुधीर रंगारी, विलास गोडे, सुधीर सोनटक्के,एस. एन. दारुंडे, डॉ. पुरण मेश्राम, डॉ. सुशील,  यांचा समावेश होता. या  प्रश्नांवर आयुक्तांनी सविस्तर उत्तरे दिली. सगळ्यात जास्त शिष्यवृत्तीची अडचण असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले. यावरही लवकरच मार्ग काढू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.

प्रारंभी संविधानाच्या प्रास्ताविक वाचनाने या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम चे कोषाध्यक्ष विलास सुटे यांनी केली. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम चे सहसचिव डॉ. बबन जोगदंड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुणे विभागाचे अध्यक्ष उमाकांत कांबळे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. तर आभार डॉ. महेंद्र मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमाचे फेसबुकवरही ऑनलाइन प्रसारण करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News