रस्त्यानं जाताना अचानक तुमच्या मागं पिसाळलेला कुत्रा लागतो. तुम्ही जीव मुठीत धरून पळता. तुमचा वेग कुत्र्यापेक्षा जास्त असतो. शेवटी कुत्रा पाठलाग थांबवतो. तुम्ही तरीही पळत राहता. सुरक्षित ठिकाणी पोचल्यावर धापा टाकता. अचानक आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याची शक्ती तुमच्या अंगात संचारली. तुम्ही स्वत:चा जीव वाचवलात. ही अतिरिक्त शक्ती आली कुठून?
आपल्या शरीरात ऑटॉनॉमस नर्व्हस सिस्टीम आहे. तिचाच एक भाग सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम तत्काळ कार्यरत झाली आणि तिनं शरीरांतर्गत प्रक्रियेत लगेच काही बदल घडवले. शरीरातील ॲडर्नलीन ग्लॅंड्समधून ॲडर्नलीन हा घटक बाहेर आला. शरीरात तत्काळ ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यानं यकृतातील साखर रक्तात सोडली. साखरेचं रक्तातील प्रमाण वाढलं. शरीराला जास्त ऑक्सिजन मिळावा म्हणून श्वासोच्छ्वासाची गती वाढली.
शरीराला जास्त रक्ताचा पुरवठा व्हावा म्हणून हृदयाचं स्पंदन वाढलं. रक्तदाब वाढला. रक्तवाहिन्या प्रसरण पावल्या. स्नायू व हाडांना जास्त शक्ती मिळावी म्हणून पचनक्रिया काही काळासाठी बंद झाली व पचनक्रियेत खर्च होणारं रक्त स्नायू व हाडांना पुरवण्यात आलं. घशाला कोरड पडली. कारण लाळेच्या ग्रंथींमधील स्राव कमी झाला. त्वचेजवळच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या म्हणून रक्त आतल्या बाजूला प्रवाहित झालं. शरीराची रोगप्रतिकारशक्ती काही काळाकरिता खंडित झाली. या सर्व प्रक्रियेतून तुम्हाला प्रचंड शक्ती मिळाली. त्याचा वापर तुम्ही कुत्र्यापासून जीव वाचवण्यासाठी केला.
अचानक एखादं संकट आलं, तर त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आपल्या शरीरात अशी अतिरिक्त शक्ती निर्माण होते. या शक्तीचा आपण एक तर पळून जाण्यासाठी किंवा संकटाशी मुकाबला करण्यासाठी उपयोग करतो. निर्माण झालेली शक्ती मुकाबला करण्यात किंवा पळून जाण्यात खर्च झाली, तर काही काळानंतर शरीरात आधीचं संतुलन प्रस्थापित होतं. कुठल्याही संकटात शरीरानं दिलेला हा नेहमीचा प्रतिसाद आहे.
आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी लवकर पोचायचं आहे आणि आपण वाहतूक कोंडीत अडकलो, हाताखालच्या लोकांनी चुका केल्यानं साहेबांची बोलणी आपल्याला खावी लागणार आहेत, दोन- तीन तासांनी आपला इंटरव्ह्मू अथवा परीक्षा आहे, अशा प्रकारचे मनावर ताण निर्माण करणारे प्रसंग आले, तरीही संकटाशी मुकाबला करणारी शरीरातील यंत्रणा कार्यरत होते. कारण खरं संकट कोणतं आणि मनावरचा ताण कोणता यातील फरक आपल्या सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीमला करता येत नाही.
निर्माण झालेली अतिरिक्त ऊर्जा वापरली गेली नाही, तर हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार बळावतात. हे टाळायचं असेल तर मनात निर्माण होणाऱ्या ताणतणावांना संतुलित करायला शिकलं पाहिजे. भावनांचं ‘ऑडिट’करायला शिकलं पाहिजे. आपल्या आवाक्यात असलेल्याच गोष्टींची आस धरली पाहिजे आणि मुख्य म्हणजे शांत राहून लढलं पाहिजे.