पावसाळी पर्यटनासाठी पावले चालली संगमेश्‍वराची वाट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 4 August 2019
  • निसर्गाचे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या संगमेश्‍वर तालुक्‍यात पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने असंख्य ठिकाणे आहेत.

निसर्गाचे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या संगमेश्‍वर तालुक्‍यात पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने असंख्य ठिकाणे आहेत. अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र मार्लेश्‍वर असो वा संगमेश्‍वरजवळच्या कसबा गावातील चालुक्‍य राजवटीतील कर्णेश्‍वर, संगमेश्‍वर, सूर्यनारायणाची मंदिरे असोत. अगदी संगमेश्‍वरजवळचे सप्तेश्‍वर मंदिरही पावसाळी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. आता तालुक्‍यात पावसाने जोर केला आहे. त्यामुळे भर पावसात पर्यटकांची पावलेही या क्षेत्रांकडे वळू लागली आहेत. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात कोसळणाऱ्या धबधब्यांच्या साक्षीने पर्यटक या पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. 

शिल्पकलेचे लेणे कर्णेश्‍वर
संगमेश्‍वरपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कसबा या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीच्या गावात हे कर्णेश्‍वराचे मंदिर वसले आहे. या मंदिराच्या उभारणीबाबत अनेक आख्यायिका आहेत. प्रतिकाशी म्हणून त्यावेळी या गावाची ओळख होती असेही सांगतात. कर्णेश्‍वर मंदिराची रचना आणि त्यासाठी वापरण्यात आलेले मोठे दगड पाहून हे मंदिर उभारणाऱ्यांच्या कलेचा आणि कलाकुसरीचा अंदाज सर्वांना येतो. महाशिवरात्रीप्रमाणेच श्रावण सोमवार आणि इतर सोमवारीही येथे भाविक मोठी गर्दी करतात. पावसाळ्यातील पर्यटनात तालुक्‍यात आलेले पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देताना दिसतात. येथील अप्रतिम शिल्पकला हीच सर्वांचे आकर्षण आहे. या मंदिराच्या बाजूलाच तालुक्‍यातील एकमेव असलेले सूर्यनारायणाचे मंदिर आहे. तर अलकनंदा आणि वरुणा नदीच्या संगमावर वसलेले संगमेश्‍वराचे मंदिरही या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आहे. एकाचवेळी येथे आलेल्या पर्यटकांना तीन मंदिरांचे दर्शन घेण्याची सुविधा आहे.

श्री क्षेत्र मार्लेश्‍वर 
देवरुखपासून अवघ्या १७ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या स्वयंभू देवस्थानाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. केवळ उन्हाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांतच नव्हे तर येथे पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांची संख्याही मोठी आहे. सह्याद्रीच्या कुशीत एका गुहेत वसलेले हे स्वयंभू देवस्थान आणि त्याच्या समोरच असलेला बारमाही वाहणारा धारेश्‍वराचा धबधबा हा सर्वांचे आकर्षण  ठरतो. हिरव्यागार वनराईत कोसळणारा हा धारेश्‍वर धबधबा प्रत्यक्षात मार्लेश्‍वरात जाऊन पाहण्याचे भाग्य काही निराळेच असते. या वर्षी सुटीच्या हंगामात तब्बल दीड लाख भाविकांनी या क्षेत्राला भेट दिली होती.

स्वयंभू सप्तेश्‍वर 
मुंबई-गोवा महामार्गापासून जवळच असलेले संगमेश्‍वरातील सप्तेश्‍वर मंदिर हेदेखील पर्यटकांचे आकर्षण आहे. मंदिरासमोर वाहणारे बारमाही पाणी, मंदिराचा निसर्गसंपन्न आवार अशा वातावरणात पावसाळी सहलीला येणारे पर्यटक सप्तेश्‍वरला आवर्जून भेट देतात. सप्तेश्‍वराच्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोर असलेल्या प्राचीन इमारतीत बारमाही पाण्याचा स्रोत असून यावरच शंकराच्या पिंडी आहेत. सात दरवाजे आणि सात ईश्‍वर यामुळेच याचे नाव सप्तेश्‍वर असल्याचे सांगितले जाते.

गडकिल्ले सध्या बंद 
संगमेश्‍वर तालुक्‍याचे शिवकाळातील वैभव असलेले आणि सह्याद्रीच्या दोन टोकांना वसलेले किल्ले प्रचीतगड आणि देवरुखजवळचे महिमानगड हे पावसाळी पर्यटनासाठी सध्या बंद आहेत. पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे स्थानिक ग्रामस्थांची इच्छा असूनही आणि पर्यटनाच्या दृष्टीने सोयीचे असूनही हे दोन्ही किल्ले सध्या ढासळले आहेत. दोन्ही गडांवर जाण्यासाठी अवघड वाटा असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी जाण्यास कोणीही धजावत नाही. पावसाळ्यानंतर मात्र दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. 

गरम पाण्याचे कुंड
संगमेश्‍वर तालुक्‍यात मुंबई-गोवा महामार्गाजवळच तीन ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. गोळवली आणि आरवली येथील बसथांब्याच्या अलीकडे तर राजवाडी गावात अशा तीन ठिकाणी असलेली हे गरम पाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. या पाण्याने आंघोळ केल्याने 
त्वचाविकार बरे होतात असा समज असल्याने या ठिकाणी पावसाळ्यातही पर्यटकांची मोठी गर्दी असते. वर्षभरही महामार्गाने प्रवास करणारे पर्यटक या कुंडांना आवर्जून भेट देतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News