हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी येऊन वर एक नजर टाकली. हा गड आणि त्याभोवतीच्या सगळ्या निसर्गसौंदर्यानं मनात घर केलं होतं. छोटा-मोठा व्यवसाय करणारी माणसं गडावर सामानाची ने-आण करताना दृष्टीस पडत होती; तर दुसरीकडे जडच्या जड लाकडाच्या मोळ्या डोक्यावर घेऊन ये-जा करणाऱ्या महिला न थकता गड उतरताना दिसत होत्या. हरिश्चंद्रगड हा सगळ्या गडांपेक्षा जरा वेगळा आहे. मोगल, मराठे यांच्या इतिहासाची या गडाला पार्श्वभूमी आहे. साडेतीन हजार वर्षांहून प्राचीन असलेला, कडेकपारींच्या नैसर्गिक संरक्षकभिंती लाभलेला हा किल्ला आहे. आदिवासी महादेव कोळी समाजाकडून हा मोगलांनी घेतला व त्यानंतर सन १७४७-४८ मध्ये तो मराठ्यांनी मोगलांकडून घेतला. कृष्णाजी शिंदे या किल्ल्याचा किल्लेदार होता. हरिश्चंद्र, तारामती, रोहिदास अशी इथल्या शिखरांची नावं आहेत, त्यामुळे थेट राजा हरिश्चंद्राच्या दंतकथेपर्यंत या किल्ल्याचं नातं जोडलं गेलेलं आहे.
चोहोबाजूंनी झाडं आणि मधूनच एक छोटासा रस्ता. येणारे-जाणारे एकत्र आले तर दोघांचं जाणं-येणं कठीण होऊन बसतं एवढा हा रस्ता निरुंद. दोन तासांच्या अथक परिश्रमांनंतर मी किल्ल्यापर्यंत आलो. पुढं कोकणकडा पाहिला. किल्ल्यावरून आसपास असणारी गावं अगदी मुंगीसारखी वाटत होती. वाडी, खिरेश्वर अशी गावं आणि त्या गावांतून अनेक माणसं या हरिश्चंद्रगडाच्या निसर्गाशी जोडलेली आहेत; किंबहुना त्यांच्या पोटापाण्याची अनेक साधनं या हरिश्चंद्रगडाभोवतीच आहेत. या किल्ल्याचं सर्वांत मोठं आकर्षण म्हणजे गडाच्या पश्चिमेला असलेला कोकणकडा.
हा महाराष्ट्रातला सर्वांत उंच कडा आहे. समोरून बघितलं तर तो नागाच्या फणीसारखा दिसतो. किती अद्भुत सौंदर्य हरिश्र्चंद्रगडाच्या सभोवती होतं. रानमेवा वेचायला आलेले अनेकजण या प्रवासादरम्यान मला दिसले. लाकूडफाटा जमा करणाऱ्या, डिंक शोधणाऱ्या महिला, चारंबोरं, करवंदं जमा करण्यासाठी फिरणारी माणसं त्यांत होती. कोकणकडा पाहून आल्यावर हरिश्र्चंद्राच्या, महादेवाच्या मंदिरासमोर असणाऱ्या तुकारामाच्या झोपडीत मी बसलो. ओमप्रकाश शेटे, शिल्पाताई शेटे, धनिशा, तपेश, डॉ. शिवरत्न शेटे, श्रीकांत कासट ही सगळी मंडळी माझ्याबरोबर होती. अर्धा तास होऊन गेला तरी तुकारामाची पिठलं-भाकरी काही येईना. सोबत आणलेलं थोडं खावं आणि तुकारामाच्या पिठलं-भाकरीचा आनंद घ्यावा यासाठी ओमप्रकाशजींनी तुकारामाला पिठलं-भाकरीचा मेनू सांगितला होता; पण सगळ्यांच्या लाडक्या असलेल्या तुकाराम हॉटेलवाल्याकडे भरपूरच गर्दी होती. मक्याचं कणीस हातात घेत थोडंसं मोकळं होऊन यावं या उद्देशानं मी झोपडीतून बाहेर पडलो.
झोपडीच्या मागच्या बाजूनं थोडंसं खाली जाऊन काही वेगळा नजारा पाहता येतो का यादृष्टीनं मी चालायला लागलो.
हरिश्र्चंद्रमंदिरापासून सुरू असलेली नदी खाली जात होती. त्या नदीच्या कडेकडेनं मी थोडा पुढं निघालो. थोडंसं पुढं गेलो तर बारा-तेरा वर्षांचा मुलगा दोन गाईंच्यामध्ये, एका गाईवर पाय आणि एका गाईवर आपल्या शरीराचा अर्धा भाग ठेवून झोपला होता; तर गाईही अगदी निवांतपणे आराम करत होत्या. दुपारच्या वेळचं ते चित्र बघून मला थोडंसं आश्चर्य वाटलं. कारण, गाईंचीही ती चरायची वेळ होती आणि त्या मुलाचीही ती जेवायची वेळ असावी; पण त्या लिंबाच्या झाडाखाली मोठ्या दगडाच्या बाजूला ते तिघं सावलीचा आनंद घेत होते. मुलाला डुलकी लागली होती आणि गाई रवंथ करत निवांत बसल्या होत्या. मी जसजसा जवळ जात होतो, तसतसे त्या गाईंचे कानं टवकारले गेले. मी अगदी जवळ गेल्यावर गाईंनी मान वळवून माझ्याकडे पाहिलं; पण त्या जागेवरून उठल्या नाहीत. त्यांना त्या मुलाला झोपेतून उठवायचं नव्हतं की काय! मुलगा अतिशय शांत झोपला होता. दोनदा हाका मारल्यानंतर त्या मुलाला जाग आली.
मी विचारलं : ‘‘काय झालं? का झोपलास? कोण आहेस तू? इतक्या वर जंगलात एकटाच काय करतोस?’’
जोराची जांभई देत तो मुलगा शांतपणे म्हणाला : ‘‘काही नाही, काका. झोपलो होतो.’’
माझ्याजवळचं कणीस मी त्याला दिलं. त्यानं ते आनंदानं घेतलं. मी विचारलं :‘‘कुठला आहेस तू?’’
त्यानं खाली बोट दाखवत ‘ते माझं गाव आहे’ असं म्हणत माझं लक्ष खालच्या गावाकडे वेधलं.
मी म्हणालो : ‘‘इतक्या वरती या गाई आल्या कशा?’’
तो मुलगा काही बोलताना खुलत नव्हता. कसलं तरी दडपण त्याच्यावर असावं असं वाटत होतं. पलीकडच्या बाजूला एक चूल मांडलेली होती आणि चुलीच्या बाजूला खापराचं एक भांडंही होतं. थोड्या वेळापूर्वीच ती चूल पेटवली गेली होती आणि काही अन्न तिथं शिजवलं गेलं होतं असं एकूण दिसत होतं. त्यानं कणीस संपवलं. आमच्याही पिठलं-भाकरीचा मेनू तयार झाला असेल आणि आपणही तिकडे निघावं अशा विचारात मी होतो. तत्पूर्वी, ‘‘इथं तू गाई रोज चारायला घेऊन येतोस का?’’ असं मी त्याला विचारलं.
तो ‘हो’ म्हणाला.
‘‘शाळेत जातोस की नाही?’’ मी विचारलं.
‘‘नाही.’’
‘‘का?’’
त्यानं काहीच उत्तर दिलं नाही.
‘‘तुझे वडील काय करतात?’’
‘‘मडकी विकतात.’’
‘‘आणि आई काय करते?’’
त्यावर तो काहीच बोलला नाही. आमचं बोलणं सुरू झालं आणि त्यातून एकेक पैलू त्याच्या सांगण्यातून पुढं येऊ लागला. लहानपणी हसण्या-बागडण्याच्या वयात, काही तरी नवीन शिकण्याच्या उमेदीच्या काळात हा मुलगा रोज काही तरी हरवून बसतोय, त्याचं जगणं अवघड झालंय आणि काळच त्याचं जगणं सुकर करू शकतो असं मला वाटत होतं.
त्या मुलाचं नाव होतं गोरोबा जामके. वय १२. त्याचा जन्म होताच त्याची आई हे जग सोडून गेली होती. पुढं त्याच्या आजीनं त्याचं संगोपन केलं. तो वर्षभराचा असताना आजीही जग सोडून गेली. त्यानंतर दुसरी आजी, म्हणजे आईची आई, त्याला तिच्या घरी घेऊन गेली. मामाचं लग्न झाल्यावर मामीला तो नकोसा झाला. आजीचंही वय झाल्यामुळे तिला स्वत:चंच होत नव्हतं, तर या छोट्या मुलाकडे ती कुठून लक्ष देणार? म्हणून त्याला परत वडिलांकडे आणून सोडण्यात आलं. तो पाच वर्षांचा असताना वडिलांनी दुसरं लग्न केलं.
गोरोबानं मला त्याची जीवनकहाणी सांगितली. त्याचं नाव गोरोबा का ठेवण्यात आलं इथपासून ते अगदी दिनचर्येविषयी. लहानपणापासूनच एखाद्याला किती संघर्ष करावा लागतो आणि मग नातीगोती, सूडबुद्धी, निंदा, कुचेष्टा यांचा सामना करत करत माणूस कसा घट्ट होत जातो त्याचं उदाहरण म्हणजे गोरोबा. कोवळ्या मनावर या सगळ्याचे कसे जास्तच परिणाम होतात हे गोरोबाच्या बोलण्यावरून मला जाणवत होतं.
गोरोबा म्हणाला : ‘‘माझ्या सावत्रआईला मी सुरुवातीपासूनच नकोसा होतो. मामा-आजीनं मला स्वीकारलं नाही तर मी जाणार कठं, या प्रश्नाचं उत्तर शोधत असतानाच सावत्रबहिणीचा जन्म झाला आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधणंही माझ्या वडिलांनी आणि सावत्रआईनं सोडून दिलं. एक वर्ष मी शाळेत गेलो. त्यानंतर आईनं मला शाळेतून काढलं. आमच्या घरी असलेल्या या दोन गाई आणि इतर लोकांच्या गाई-म्हशी घेऊन त्यांना चरायला घेऊन जाण्याच्या कामाला मला लावण्यात आलं.’’
मी म्हणालो : ‘‘इथं तर दोनच गाई दिसत आहेत, बाकीची जनावरं कठं आहेत?’’
गोरोबा म्हणाला : ‘‘मी सकाळी आठ वाजताच आलो होतो. बाकी सगळी जनावरं घराच्या दिशेनं गेलीही. या दोन गाई माझ्या घरच्या आहेत. माझ्याशिवाय त्या कुठंही हलत नाहीत. मी जिकडे जाईन तिकडे त्या असतात. कारू आणि मारू अशी या दोन्ही गाईंची नावं.’’
गोरोबा पुढं म्हणाला : ‘‘ काल रात्री माझी झोप नीट झाली नाही. कारण, आमच्या बाजूला असलेल्या काकूंकडे रात्रभर तूर धुण्यासाठी आईनं मला पाठवलं होतं. दिवसा जनावरं चारायची आणि रात्री कुणाच्या तरी घरी जाऊन काम करायचं असा माझा दिनक्रम असतो. फार कमी वेळ मला झोप मिळते, त्यामुळे दिवसा या दोन्हींपैकी कुठल्याही गाईचा मला स्पर्श झाला की लगेच माझा डोळा लागतो.’’ माझ्याशी बोलत असताना गोरोबा गाईच्या पाठीवरून हात फिरवत होता आणि गाय त्याला चाटत होती.
गोरोबा म्हणाला : ‘‘शेजारच्या काकू त्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करत असताना, आंघोळ घालत असताना आपली आई कशी असते हे मला दिसत असतं. ती किती काळजी घेते, आपल्याला ठेच लागली की तिला कसा त्रास होतो हे मी सारं पाहत असतो.’’
‘‘सकाळपासून काही खाल्लंस की नाही,’’ मी विचारलं.
तो म्हणाला : ‘‘जिथं जे मिळेल तिथं ते खायचं, नाही तर आपल्या या दोन्ही ‘आई’ झिंदाबाद आहेतच.’’
मी म्हणालो : ‘‘ते कसं काय?’’
‘‘कारू आणि मारूचं दूध काढायचं, ते भांड्यात गरम करायचं आणि प्यायचं,’’ बाजूला असलेल्या त्या मातीच्या भांड्याकडे बोट दाखवत गोरोबानं मला सांगितलं.
आईच्या प्रेमाचा भुकेला असलेल्या, वडिलांनी पाठीवरून हात फिरवावा यासाठी आतुर असलेल्या गोरोबाच्या नजरेत मला दोन सावत्रमुलं दिसत होती! एक परिस्थितीशी झुंजणारा आणि दुसरा, हाही काळ निघून जाईल, हा आपला सगळा त्रास कधी ना कधी संपेल आणि आईच्या रूपानं आपल्यावर कुणी तरी प्रेमाचा वर्षाव करेल ही आशा मनात बाळगणारा...
भविष्याच्या दृष्टीनं शाळा नाही, पोटभर अन्न नाही, डोक्यावर मायेचं छत नाही अशा परिस्थितीत गोरोबा दिवस काढत होता. त्याची हलाखीची परिस्थिती पाहून असे किती ‘गोरोबा’ अवतीभोवती असतील हा प्रश्न मनात आला.
गोरोबा म्हणाला : ‘‘निघतो मी आता. खूप दिवसांनंतर मी कुणाकडे तरी मन मोकळं केलं.’’ त्यानं दोन्ही गाईंना हाका दिल्या. दोन्ही गाई हंबरत त्याच्याकडे आल्या आणि तिघंही झाडीत दिसेनासे झाले.
अगदी कमी वेळेत गोरोबानं त्याचा सगळा इतिहास आणि वर्तमान माझ्यासमोर ठेवलं होतं. सावत्रपणाचं सावट काय असतं आणि त्यापायी एखाद्याला काय सोसावं लागतं याचं गोरोबा हे उदाहरण होतं. खरं तर खेळण्या-बागडण्याच्या, फुलण्या-बहरण्याच्या काळात अशी वेळ कुणावरही येऊ नये; पण ती गोरोबावर आली होती.
मी परत आलो. तुकारामानं तयार केलेलं जेवण एव्हाना थंड झालं होतं. बाकीच्या सगळ्यांनी जेवण आटोपून घेतलं होतं. मी जेवायला बसलो आणि पहिला घास घेतानाच उपाशी गोरोबाचा चेहरा डोळ्यांपुढं आला. आपल्या आईच्या, आजीच्या आठवणींनी डोळे भरून आलेल्या गोरोबासारखी वेळ कुणावरही येऊ नये, असं मला वाटलं...