परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबई : महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे सोमवारी जाहीर केले आहे. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम असल्याचे उदय सामंत यांनी आज स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला आज पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सचिव उच्च शिक्षण भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डी. पी. सिंग यांना पाठलेल्या पत्रात मंत्री सामंत यांनी म्हटले आहे की, कोरोना रुग्ण संख्येत आज भारत तिसऱ्या स्थानी असून, महाराष्ट्रात हे सर्वाधिक बाधित राज्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या सत्राच्या दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अतिशय धोकादायक ठरेल. तसेच त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, पूरक कर्मचारी, तसेच इतर यंत्रणांचे स्वास्थ्य धोक्‍यात येऊ शकेल. सध्या विविध शैक्षणिक संस्था, वसतिगृहे आणि इतर सुविधा या विलगीकरणासाठी तसेच कोरोना संबंधित इतर कारणांकरिता प्रशासनाद्वारे अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे त्यांच्या मूळ गावी परतले असल्याने, परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास, त्यांची निवास व भोजन व्यवस्था या अवघड बाबी आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्‍यात येऊन त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तसेच काही इतर राज्यांमध्ये तसेच देशांमध्ये परीक्षा घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना सदर विषाणूची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असेही सामंत यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

विद्यार्थी शैक्षणिक परिसंस्थेचा केंद्रबिंदू
परीक्षा घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर सदर परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 6 जुलै रोजीच्या सूचना या आयोगाच्या या पूर्वीच्या सूचनांप्रमाणेच बंधनकारक नसून केवळ मार्गदर्शक स्वरूपाच्या आहेत, असे सामंत यांनी पत्रात नमूद केले आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या अनिश्‍चिततेच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी हा घटक शैक्षणिक परिसंस्थेचा केंद्रबिंदू असल्याने त्याचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, भवितव्य आणि हिताचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सूत्राच्या आधारे पदवी प्रदान करण्याबाबत आपण एकसमान मार्गदर्शक सूचना निर्गमित कराल, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News