नववर्षापासून 'सेट'’च्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरूवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

नाशिकसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोव्यातील पणजी अशा विविध पंधरा शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार

नाशिक : महाराष्ट्र तसेच गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्‍यक असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलिजिब्लिटी टेस्ट (सेट) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार इच्छुक पात्र उमेदवारांना परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी १ जानेवारी २०२० पासून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. २१ जानेवारीपर्यंत अर्जाची अंतिम मुदत आहे. तर २८ जूनला सेट परीक्षा घेतली जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा घेतली जाते. ३६ व्या एमएच-सेट परीक्षेचे दिशानिर्देश विद्यापीठाने जारी केले आहेत.

या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरणे आवश्‍यक आहे. मात्र, भरलेल्या अर्जाची प्रत विद्यापीठ किंवा अन्य कुठल्याही पत्त्यावर पाठविण्याची आवश्‍यकता नाही. सद्यःस्थितीत विविध ३२ विषयांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. नाशिकसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नगर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोव्यातील पणजी अशा विविध पंधरा शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासंदर्भात जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जानेवारी २०२० पासून सुरू होणार आहे. २१ जानेवारीपर्यंत अर्ज भरायची संधी असून, त्यानंतर अर्ज दुरुस्तीची मुदत २९ जानेवारीपर्यंत असेल. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी आठशे रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साडेसहाशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

सेट परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्‍न विचारले जाणार असून, एकूण तीनशे गुणांसाठी दोन पेपर घेतले जातील. २८ जून २०२० ला होणाऱ्या या परीक्षेत सकाळी दहा ते अकरा यादरम्यान पेपर क्रमांक एक होईल. यामध्ये प्रत्येकी दोन गुणांसाठी पन्नास प्रश्‍न सोडवायचे असतील. विशेष विषयावर आधारित पेपर क्रमांक दोनमध्ये शंभर प्रश्‍न विचारले जातील. हा पेपर दोन सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत होईल. पेपरचे अ, ब, क, ड असे चार संच असतील. #विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत ऑनलाइन स्वरूपात (सीबीटी) यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा २० जून २०२० ला संपत आहे. सेट परीक्षेच्या यापूर्वी जाहीर वेळात्रकानुसार २१ जूनला परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षेच्या तारखेत बदल करत २८ जून निश्‍चित केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News