शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरू करा; आदित्य ठाकरे यांचे मोदींना पत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्तिथीत  विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, याकरीता सर्व परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात याव्या तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरीता शैक्षणिक वर्ष देखील जानेवारी २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करत महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्तिथीत  विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, याकरीता सर्व परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात याव्या तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरीता शैक्षणिक वर्ष देखील जानेवारी २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करत महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीच जेईई आणि नीट या दोन्ही प्रवेश परीक्षांसंदर्भात सुनावणी होत असताना, सर्वोच्च न्यायालयाने ह्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार सप्टेंबर महिन्यात घेतल्या जाव्यात असा निर्णय दिला. परंतु या निर्णया विषयी विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही विद्यापीठे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्था अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच प्रवेश परीक्षा घेण्याची प्रक्रिया राबवत आहेत. कोरोना महामारीमुळे ४ महिने केलेला लॉकडाऊन हा काही अंश स्थगित करण्यात आला असला तरी आजही अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था नियमितपणे सुरु झालेली नाही. अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास अनेक अडचणी निर्माण होतील, तसेच यादरम्यान विद्यार्थ्यांना  कोरोनाची लागण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, म्हणून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी  मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे मोदींना केली आहे. तसेच जगातील ज्या ज्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याचा घाट घालण्यात आला त्या ठिकाणची कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याचे ही आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देशात  विविध अभ्यासक्रमानंकरीता सुरु असलेली प्रवेश प्रक्रिया ही तात्पुरती स्थगित करून पुढे ढकलावी तसेच २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष जून पासून सुरु झाले असले तरी इलेक्ट्रॉनिक साधनांचा अभाव असल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन भरवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरता नवे शैक्षणिक वर्ष हे जानेवारी २०२१ पासून सुरु करण्याचाबाबत विचार करावा अशी विनंती वजा मागणी आदित्य ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News