लग्नासाठी खास ‘जोडा’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

सध्या लग्नातील प्रत्येक समारंभात घातल्या जाणाऱ्या पेहरावानुसार त्यावर साजेशी पादत्राणे घेतली जातात. मुलांचा बुटासोबत जुती किंवा कोल्हापुरी चप्पल घेण्याकडे अधिक कल दिसतो.

सध्या लग्नातील प्रत्येक समारंभात घातल्या जाणाऱ्या पेहरावानुसार त्यावर साजेशी पादत्राणे घेतली जातात. मुलांचा बुटासोबत जुती किंवा कोल्हापुरी चप्पल घेण्याकडे अधिक कल दिसतो. मुलींना पेहरावाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे मुलींकडे वेगवेगळ्या प्रकारचे किमान चार-पाच जोड असतातच. त्याविषयी डिझायनर चप्पल किंवा सॅंडल, जुती, कोल्हापुरी चप्पलची सध्या चलती आहे.   

लग्नाच्या पादत्राणांच्या खरेदीवेळी लग्न कोणत्या पद्धतीने होणार आहे याचाही विचार करायला हवा. बहुतांश लग्न अजूनही पारंपरिक पद्धतीने होतात; पण काही लग्नांमध्ये वेगवेगळ्या थीम्सपासून ते वेस्टर्न स्टाईलपर्यंत वेगळ्या पद्धती पाहायला मिळतात. लग्नसमारंभात होणारे विधी, त्या त्या वेळचे पेहराव लक्षात घेऊन त्यावर जाणारी पादत्राणे घ्यायला हवीत. अलीकडे बाजारात पादत्राणांमध्ये नववधू-वरांसाठी बरीच व्हरायटी आली आहे. मोठ्या शहरांमध्ये लग्नासाठी लागणारे कपडे, पादत्राणे, इतर सर्व ॲक्‍सेसरीज एकाच ठिकाणी मिळतात. निवडलेल्या पेहरावावर उठून दिसेल अशी पादत्राणे लगेचच निवडणे यामुळे शक्‍य होते.  

 नवऱ्या मुलासाठी ...
लग्नात वेगवेगळ्या विधींना वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव केले जातात. अनेकदा नवरा-नवरी एखादी थीम ठरवून पारंपरिक, आधुनिक, भारतीय, वेस्टर्न अशा प्रकारचे कपडे घालणे पसंत करतात. त्या त्या ड्रेसवर शोभून दिसेल अशीच पादत्राणे निवडली जातात. तुमचा कितीही चांगला ड्रेस असेल आणि त्यावर चांगले शूज, सॅंडल, चप्पल नसेल तर त्याचा काही उपयोग नसतो. त्यामुळे कोणत्या पेहरावावर कोणत्या प्रकारची पादत्राणे असावीत, त्यांचा रंग कोणता असावा, वर्क कसं असावं, हील्स कशा असाव्यात अशा सगळ्या बाबींचा विचार पादत्राणांच्या खरेदीवेळी करावा लागतो. आपल्याकडे साधारणपणे नवरदेवासाठी सूट, इंडो-वेस्टर्न किंवा शेरवानी, जोधपुरी सूट, कुर्ता-पायजमा असे कपडे निवडले जातात. हे कपडे खुलून दिसण्यासाठी त्यावर साजेशी पादत्राणं घालणंही महत्त्वाचं आहे. साधारणपणे सुटासोबत फॉर्मल शूज घातले जातात.

फॉर्मल शूजमध्ये ब्लॅक, ब्राऊन, मरून, ऑलिव्ह ग्रीन असे ठराविक रंग येतात. 
जर तुम्ही शेरवानी, कुर्ता पायजमा घालणार असाल तर त्यावर ‘मोजडी’ किंवा ‘जुती’ शोभून दिसेल. जुतीच्या भरपूर व्हरायटी सध्या बाजारात पाहायला मिळतात. विविध आकार व प्रकार यात उपलब्ध आहेत. खास लग्नासाठी, लग्नातील एकूण पेहरावाला साजेशा अशा जुतींचा वेगळा सेक्‍शनही दुकानांमध्ये असतो. या जुतींमध्येही सोनेरी, चंदेरी, मरून या रंगांसोबतच आता लाल, हिरवा, निळा, जांभळा, गुलाबी, पिवळा अशा रंगांतील फॅन्सी जुती पाहायला मिळतात. प्लेन जुती किंवा गोंडा असलेल्या, कुंदन वर्क, स्टोन वर्क, जरदोसी, एम्ब्रॉयडरी किंवा लेस लावलेल्या जुती तुम्ही तुमच्या कपड्यांच्या प्रकारानुसार व रंगानुसार घेऊ शकता. जूट, सिल्क अशा कापडांमधूनही जुती उपलब्ध आहेत. 
लग्नात हौसेने ‘मोजडी’ घेतली जाते; पण तिचा नंतर फारसा वापर होत नाही. त्यामुळे काही पारंपरिक पेहरावासाठी मोजडीऐवजी कोल्हापुरी चप्पलदेखील ट्राय करता येईल. ही चप्पल नंतर नेहमीच्या समारंभात किंवा बाहेर जातानाही घालता येऊ शकते. कोल्हापुरी चप्पलांनी आपला पारंपरिक बाज कायम ठेवत त्यात मॉडर्न स्टाईल आणल्या आहेत. मुलांसाठी ‘शाहू’, ‘धनगरी’, ‘कापशी’, ‘पेशावरी’, ‘गांधी’, ‘कुरूंदवाड’ असे वेगवेगळे प्रकार कोल्हापुरी चपलांमध्ये उपलब्ध आहेत. 

खास नवरीसाठी...
लग्नात बराचसा वेळ नवरा-नवरी सोबत असतात. त्यामुळे दोघांची उंची लक्षात घेऊन चप्पल-सॅंडलच्या हिल्सची उंची ठरवावी. मुलीची उंची नवरदेवापेक्षा कमी असल्यास थोडी जास्त हिल्स असलेली चप्पल किंवा सॅंडल घ्यायला हरकत नाही. लग्नात विशेषतः रिसेप्शनच्या वेळी बराच वेळ उभं राहावं लागणार असल्यामुळं कम्फर्टेबल वाटेल अशाच चप्पल किंवा सॅंडल घ्यायला हव्यात. हाय हिल्स थोड्या वेळासाठी घालायला चांगल्या वाटतात; पण खूप वेळ उभं राहायचं असेल तर सवय नसल्यास या उंच टाचांच्या चपलांमुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे रिसेप्शनसाठी हाय हिल्सपेक्षा मीडियम किंवा कमी हिल्सच्या चप्पल, सॅंडलला प्राधान्य द्यायला हवं. मुलींसाठी चप्पल, सॅंडल, जुती, कोल्हापुरी चप्पल या प्रकारांतून असंख्य व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. मणी, स्टोन, डायमंड, जरदोसी वापरून नाजूक नक्षीकाम केलेल्या कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला मुलींना लग्नाच्या खरेदीवेळी विचारात घेता येतात. ‘फ्रंट क्‍लोज्ड’, ‘फ्रंट ओपन’, अंगठ्याची, अंगठा नसलेली, मागे बेल्ट असलेली, बेल्ट नसलेली चप्पल किंवा सॅंडल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चपलेच्या टाचांनुसार ‘फ्लॅट हिल्स’, ‘प्लॅटफॉर्म हिल्स’, ‘बॉक्‍स हिल्स’, ‘पेन्सिल हिल्स’ असे काही प्रकार पडतात. पूर्वी मरून, गोल्डन, सिल्व्हर या रंगांत उपलब्ध होणाऱ्या या चपलांमध्ये आता पिवळा, हिरवा, निळा, लाल असे वेगवेगळे रंगही आले आहेत. पैठणी, नऊवारी साड्यांवर कोल्हापुरी चप्पल छान दिसतात. या चप्पलांमध्येही आकर्षक रंग व डिझाइन्स पाहायला मिळतात. साड्यांच्या काठाची बॉर्डर असलेल्या चपलाही या प्रकारातून उपलब्ध आहेत. 
लग्नाच्या दिवशी घालता येईल असा एक प्रकार म्हणजे जुती. नवरीसाठी किंवा करवल्यांसाठीही हा प्रकार एकदम स्टायलिश आहे. एकाच रंगातून किंवा मल्टिकलरमध्येही जुती उपलब्ध आहेत. बॅक ओपन, बॅक क्‍लोज्ड, बेल्ट असलेल्या जुती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बॅक ओपन म्हणजेच फ्लिपफ्लॉप मोजडी मागून चप्पलसारखी असल्यामुळे पटकन काढता-घालता येते. लग्न-समारंभात जाण्यासाठी कोणत्याही पेहरावावर मुली या मोजडी घालू शकतात. या मोजडी जीन्सवर, चुडीदारवर, साडीवर घालता येत असल्यामुळे नंतरही त्याचा वापर होऊ शकतो. प्लेन मोजडी आणि डिझायनर मोजडी हेही दोन पर्याय आहेत. डिझायनर मोजडीमध्ये स्टोन, मणी वापरून नाजूक नक्षीकाम करून अधिक आकर्षकपणा आणला आहे.  एकूणच काय, ‘परफेक्‍ट लूक’ मिळवण्यासाठी चपलांकडे ‘पायातील वहाणा’ म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. लग्नाचा हा आयुष्यातील ‘स्पेशल इव्हेंट’ व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी तुम्हाला चप्पल, बूट निवडताना थोडं चोखंदळ राहावं लागेलच ना!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News