महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा यूपीएससी परीक्षेत यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • ४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा डंका वाजला आहे.
  • महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेत यश मिळाले असून अनेक तरुण तरुणी यूपीएसीच्या टॉप रँकर्सच्या यादीत झळकले आहेत.
  • हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने या परीक्षेत ५७४वा रँक मिळवून यश संपादन केले आहे.

हिंगोली :- ४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा डंका वाजला आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेत यश मिळाले असून अनेक तरुण तरुणी यूपीएसीच्या टॉप रँकर्सच्या यादीत झळकले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने या परीक्षेत ५७४वा रँक मिळवून यश संपादन केले आहे.  यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणाचे नाव सुरेश शिंदे असून त्याचे वडील हे जेमतेम अडीच एकर एवढ्या जमिनीमध्ये शेती करून आपल्या कुटुंबाचे संगोपन करतात. तसेच गेले वीस वर्षांपासून ते आपल्या शेतातील मातीच्या घरात राहतात.  स्वतः अशिक्षित असूनही सुरेशच्या पालकांनी त्याला शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले. सुरेशने देखील जिद्दीने अभ्यास करून यूपीएससी परीक्षेत यश मिळवून आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.

सुरेश शिंदे याचे प्राथमिक शिक्षण हे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर त्याने आपले दहावी पर्यंतचे शिक्षण हे गावातील रोकडेश्वर विद्यालयात पूर्ण केले.  उच्च शिक्षण घेऊन भविष्यात एक मोठा अधिकारी व्हायचंय हे स्वप्न उराशी बाळगून त्याने आपले गाव सोडून नांदेड गाठलं.  २०१२ रोजी त्याने आपली १२वी उत्तीर्ण करून अभियांत्रिकी कॉलेजातून ८२ टक्के गुण मिळवले. २०१५ मध्ये त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ची पदवी देखील मिळवली. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला मोठ्या पगाराची ऑफर देखील आली होती परंतु अधिकारी व्ह्याचे स्वप्न उराशी असल्याने सुरेशने त्या नोकरीस नकार दिला. 

२०१७ मध्ये सुरेशने यूपीएससी परीक्षेसाठी पहिला प्रयत्न केला परंतु तो त्यात यशस्वी झाला नाही. त्याने २०१८ मध्ये ही पुन्हा परीक्षा दिली परंतु त्याही परीक्षेत सुरेशला अपयश मिळाले. आलेल्या अपयशाने निराश न होता पुन्हा नव्या जिद्दीने त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि अखेर २०१९ च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तो चांगली रँक मिळवून यशस्वी झाला. आपण पास झाल्याची बातमी आईवडिलांना कळविल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. सुरेशने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News