मोतीबिंदू होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे, तसेच तो होण्याचे वयही कमी कमी होत आहे. शस्त्रक्रियेनंतर शक्यतो चष्मा नको, अशी मानसिकता लोकांची झाली आहे. सध्याचे शस्त्रक्रिया तंत्र, तंत्रज्ञान व साधने यात अनेक क्रांतिकारक बदल झाले आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही नुसती मोतीबिंदू काढण्यापूर्ती मर्यादित न राहता त्यात नंबर घालवणेसुद्धा अंतर्भूत झाले आहे.
पूर्वी मोतीबिंदू एकसंध निघाला, की शस्त्रक्रिया पूर्ण यशस्वी झाली, असे समजले जायचे. मधल्या काळात मोतीबिंदू काढून लेन्स व्यवस्थित बसविली गेली की शस्त्रक्रिया पूर्ण यशस्वी समजत; पण सध्या मात्र मोतीबिंदू काढून योग्य ती लेन्स योग्य त्या अँगलमध्ये बसवून लांबचे, मध्य व जवळचे चष्म्याशिवाय दिसले तरच पूर्ण यशस्वी असे म्हटले जाते.
15 वर्षांपूर्वी बिनटाक्याची सहा ते सात एमएम छेदाची शस्त्रक्रिया रूढ होती. तेव्हा लेन्स कडक असे. त्यामुळे दीड ते दोन नंबर येत असे. त्यानंतर गेली दहा वर्षे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया सुरू आहेत. त्यामध्ये नुसते थेंब घालून डोळा बधीर केला जातो व 3.2 एमएम छेदांतून मोतीबिंदू काढून घडीची लेन्स इंजेक्शन सिरीजने आत सोडली जाते. ती आत पसरते व मूळच्या लेन्सची जागा घेते.या पद्धतीमुळे बहुतांशी गुंतागुंत कमी झाली आहे.
सुरवातीच्या घडीच्या लेन्सेसमुळे चष्म्याशिवाय फक्त लांबचे उत्तम दिसे. मात्र, जवळ पाहण्यासाठी (उदा : लिहिणे, वाचणे, धान्य निवडणे, सुई ओवणे) चष्मा लावावा लागे. सध्याच्या शस्त्रक्रियेसाठी मोतीबिंदू तयार होण्याची (पूर्वीच्या भाषेत पिकण्याची) वाट पाहावी लागत नाही.
नजर थोडी कमी झाली, कामास त्रास होऊ लागला, चष्म्याचा नंबर वाढू लागला, की लगेच शस्त्रक्रिया करता येते. घडीच्या "मल्टी टॉयल लेन्स' उपलब्ध झाल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर लांबचे व जवळचेही चांगले दिसू शकते. "टोरिक लेन्स'मुळे विषम दृष्टीचाही प्रश्न सुटला आहे. यामध्ये ज्या अँगलमध्ये विषम दृष्टी आहे त्या अँगलमध्ये लेन्स बसवावी लागते व त्या लेन्सची क्षमता भिन्न अंशांत भिन्न असते.
शस्त्रक्रियेसाठी "सेंटीरियन व्हिजन सिस्टिम', "इंटेलिजेल' हे जगातील सर्वोत्तम सुरक्षित व कार्यक्षम आधुनिक मशिन वापरले जाते. सध्या शस्त्रक्रियेनंतर तत्काळ दिसू लागते. फार थोडे दिवस औषधे घालावी लागतात. लवकर कामाला लागता येते, तसेच तुम्ही टीव्ही, कॉम्प्युटर मोबाईल, लिहिणे, वाचणे, चष्म्याशिवाय करू शकता.
गेल्या 20 वर्षांत मोतीबिंदू शस्त्रक्रियेत आमूलाग्र बदल घडला आहे, तसेच शस्त्रक्रिया व तपासणी अचूक निदान यासाठी उपकरणे, कॉम्प्युटर्समुळे सूक्ष्मपणा, सोनोग्राफीमुळे जे दिसत नव्हते ते दिसू लागले. एकंदर काय तर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, अल्टासाऊंड, मायक्रोस्कोप या सर्वांच्या एकत्रीकरणाने हे क्रांतिकारक बदल शक्य झाले.