...म्हणून ऑलिंपिक स्पोन्सर संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 June 2020
  • जपानमधील एनएचके वाहिनीचे सर्वेक्षणा

टोकियो ऑलिंपिक एक वर्ष लांबणीवर टाकल्यामुळे संयोजकांची डोकेदुखी वाढली आहे. या स्पर्धेसाठी संयोजकांनी पुरस्कर्ते मिळवत ऑलिंपिक संयोजन फायदेशीर करण्याच्या दिशेने पावले टाकली होती; पण आता जवळपास 65 टक्के उद्योगसमूह पुरस्कर्ते होण्याबाबत डळमळीत आहेत.

जपानमधील एनएचके वाहिनीने या स्पर्धेच्या पुरस्कर्त्यांचे मत जाणून घेतले. त्यांच्या सर्वेक्षणानुसार 65 टक्के पुरस्कर्त्यांनी अंतिम निर्णय घेतलेला नाही. पुरस्कार अजून एक वर्ष कायम ठेवण्याबाबत ते विचार करीत आहेत. या स्पर्धेच्या कालावधीत प्रेक्षक संख्येवर मर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. या परिस्थितीत उत्पादनाची प्रभावी जाहिरात करण्यावर मर्यादा येतील, असे बहुतेक कंपन्यांचे मत आहे. स्पर्धा 2021 मध्ये झाली नाही, तर पूर्णपणे रद्द करण्यात येईल, अशी टिप्पणी संयोजन समितीतील अधिकारी सातत्याने करीत आहेत. या परिस्थितीत स्पर्धा होण्याबाबत प्रश्न आहेत, त्यामुळे पुरस्कर्ते असून फायदा काय, अशी विचारणा होत आहे. कोरोनामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्थेस फटका बसला आहे. त्यापासून जपानी कंपन्याही सुटलेल्या नाहीत. हा आर्थिक ताण असतानाच पुरस्कर्ते होण्याबाबत विचार करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

ऑलिंपिक स्पर्धा एक वर्ष लांबल्यामुळे संयोजनावरील आर्थिक बोजा खूपच वाढला आहे. संयोजकांनी नेमका खर्च किती वाढला आहे, हे सांगितलेले नाही, पण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने आपण अतिरिक्त 80 कोटी डॉलरची अतिरिक्त तरतूद केली असल्याचे सांगितले. नव्या अंदापपत्रकानुसार स्पर्धेचा खर्च 12.6 अब्ज डॉलर असेल. तो संयोजन समिती, जपान सरकार तसेच टोकियो शहर प्रशासन करणार आहे.

स्पर्धा उत्पन्नातील निम्मी रक्कम पुरस्कर्त्यांकडून अपेक्षित

टोकियो ऑलिंपिकसाठी कॅनन, एनईसी, असाही ब्रयूवरीज हे पुरस्कर्ते आहेत. जपानमधून स्पर्धेस 3.3 अब्ज डॉलरचे पुरस्कर्ते लाभणार आहेत. स्पर्धेच्या एकंदर अपेक्षित 5.9 अब्ज डॉलर उत्पन्नापैकी पुरस्कर्त्यांकडून मिळणारी रक्कम निम्म्यापेक्षा जास्त आहे. पुरस्कर्त्यांचा कल माहिती असल्यामुळेच संयोजक स्पर्धेचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News