... म्हणून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे: राजेश टोपे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 April 2020
  • राज्यात 75 हजार "रॅपिड टेस्ट' केल्या जातील.
  • मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) निर्देशांनुसार केल्या जात आहेत. केंद्र सरकारने काही निकषांवर मान्यता दिल्यानुसार राज्यात 75 हजार "रॅपिड टेस्ट' केल्या जातील. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्‍सिजन स्टेशन तयार करण्यावर भर देण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (ता. 20) सांगितले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती दिली. राज्यातील चाचण्यांची संख्या वाढत असल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहेत. घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी 6359 पथके कार्यरत आहेत.

कोरोना उपचार रुग्णालयांमध्ये आता ऑक्‍सिजन स्टेशन उभारण्यात येतील. प्रत्येक खाटेजवळ ऑक्‍सिजन मास्क आणि ऑक्‍सिजनचा पुरवठा व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या गरजेनुसार त्यांचा वापर केला जाईल. मेडिकल ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होऊ नये अशा सूचना उत्पादकांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. एक्‍स-रे, एसपीओटू पल्स ऑक्‍सिमीटर अशा काही छोट्या चाचण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. एकूण 15 हून अधिक रुग्ण असलेला जिल्हा रेड झोन, 14 दिवसांत एकही नवा रुग्ण न आढळलेला जिल्हा ऑरेंज झोन आणि 28 दिवस नव्याने एकही रुग्ण न आढळलेला जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनचे वाटप

हायड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते; म्हणून मुंबईतील काही भागांत या गोळ्यांच्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. हृदयविकार किंवा 60 वर्षांवरील आणि 15 वर्षांखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत.

... तेव्हाच समाधान

राज्यातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग सुरुवातीच्या दोन दिवसांवरून आता सुमारे सात दिवसांवर गेला आहे. हा दर 20 ते 25 दिवसांवर येईल, तेव्हा काहीशी समाधानाची बाब मानता येईल, असे राजेश टोपे म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News