...तर असं करा सासूवर प्रेम

मिलिंद अष्टपुत्रे.
Friday, 7 June 2019

सकाळच्या हातघाईची वेळ होती. आज ऑफिसला जरा लवकर पोहोचायचे होते. फॉरेन डेलिगेट्स बरोबर च्या मिटींगची तयारी करायची होती.

सकाळच्या हातघाईची वेळ होती. आज ऑफिसला जरा लवकर पोहोचायचे होते. फॉरेन डेलिगेट्स बरोबर च्या मिटींगची तयारी करायची होती. मी पटापट कामे हातावेगळी करत होते. आठ वाजून गेले तरी लक्ष्मी चा पत्ता नव्हता. नेमक्या घाईच्या वेळी बरोबर उशिरा येतात ह्या बायका  स्वतःशीच रागारागाने पुटपुटत मी वॉशरूम कडे वळले. शॉवर घेऊन परतले तर समोर लक्ष्मी उभी !

का गं इतका उशीर ? काल एवढं बजावूनही आज तू उशिरा आलीस. माझ्या सांगण्यामागे काहीतरी कारणं असतं.  माझ्या तोफखान्याला निमूटपणे तोंड देत तिने खालमानेनं विचारलं,

काय स्वयंपाक करू?

तिला मेन्यू सांगून मी कपडे चेंज करण्यासाठी बेडरूममध्ये पळाले. बीपीन ही आवरून तयार झाला होता.

बीप्स, अरे लक्ष्मी थोडी उशिरा आली आहे तुझा टिफिन तयार व्हायला थोडा वेळ लागेल  मी म्हणाले. नो प्रॉब्लेम, मी ऑफिसमध्ये मॅनेज करेन काहीतरी कारण असेल गं तिच्या उशिरा येण्याचं, चल बाय मी निघतो. शांतपणे बोलून बिपिन निघून गेला.

चेंज करून किचन मध्ये येत मी लक्ष्मी वर तणतणले, बघ तुझ्या मुळे साहेब टिफिन न घेता गेले ! घाई असते गं सकाळची, तुला कळत कसं नाही ? काहीच उत्तर न आल्याने मी लक्ष्मी कडे पाहिले. खालमानेने पोळ्या लाटताना तिच्या गालावरुन अश्रू ओघळत होते.

का गं ? काय झालं ?  चमकून मी विचारलं. घरी काही प्रॉब्लेम झालाय का ?काही नाही ताई ! नेहमीचंच रडगाणं !" ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. म्हणजे पुन्हा तुझ्या नवऱ्यानं तुला मारलं वाटतं ! आता काय कारण काढलं  कुत्सितपणे मी तिला विचारलं. पोळपाटावरचं लाटणं भराभर चालवत लक्ष्मी बोलू लागली,

काल कामानं अगदी पिट्ट्या पडला होता. शेजारच्या वझे काकूंकडे त्यांच्या मुलीची मंगळागौर होती. सगळा स्वयंपाक आणि नंतरची आवराआवरी, पुन्हा नेहमीची कामे होतीच ! मी संध्याकाळी दमून घरी गेले. जराशी अंग टाकावं म्हणून अंथरुणावर पडले आणि गाढ झोप लागली. सासूबाईंनी मुद्दाम उठवले नाही. आठ वाजता हे आले ते पिऊनच!! घरी आल्या आल्या त्यांना जेवायला लागतं. मला झोपलेली बघून त्यांचं डोकं फिरलं. त्यातच काहीतरी बोलून सासूबाईंनी आगीत तेल ओतलं ! झालं, बदडत सुटले मला ! दिवसभर मी घरासाठी किती मरमर करत होते ते गेले कुणीकडे! " अचानक बांध फुटून लक्ष्मी ओक्साबोक्शी रडू लागली.

ताई ,कधी कधी वाटतं कशासाठी जगतीयं मी अशी ? एकदाच सगळं संपवून टाकावं तिच्या पाठीवरून हात फिरवत मी मूकपणे तिला धीर देत राहिले. जराशा विमनस्क अवस्थेतच मी ऑफिसमध्ये पोहोचले. वेळेवर सुरू झालेली मीटिंग एकदम झकास पार पडली.

रागिणी  वेल डन  सरांचे कौतुकाचे बोल झेलत मी रिलॅक्स झाले. डोक्यात मात्र लक्ष्मीचेच विचार घोळत होते. लंच टाईम मध्ये आम्ही सगळे चेष्टामस्करी करत टिफिन खात होतो. वसुधाने बहुतेक आज डबा आणला नव्हता.

वसुधा अगं खा नं आमच्या डब्यातलं !" मी सगळ्यांच्या वतीने तिला म्हणाले अगं नाही. माझा उपवास आहे आज !!" माझी नजर चुकवत वसुधा म्हणाली. कुछ तो गडबड है दया  मनातल्या मनात मी पुटपुटले. जेवण झाल्यावर मी बिपिनला फोन केला.

 बिप्स  अरे जेवायचं काय केलंस? मी कॅन्टीन मध्ये जेवलो रागिणी  डोन्ट वरी ! संध्याकाळी भेटल्यावर बोलू . आत्ता जरा घाईत आहे. फोन ठेवून मी वसुधा कडे निघाले. वसुधा एकटीच टेबलवर काही तरी लिहीत होती. का गं वसुधा ! एनी प्रॉब्लेम ?" मी विचारलं

 नेहमीचचं गं  उदासपणे हसत वसुधा म्हणाली.  तुझं बरं आहे रागिणी ! तुझा राजा-राणीचा संसार आहे. आमचं तसं नाही. एकत्र कुटुंबात खूप घुसमट होते गं काही वेळा ! आज स्वयंपाकाची पाळी जाऊबाईंची होती. त्यांचं आणि सासूबाईंच काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळे त्यांनी स्वयंपाक केलाच नाही. मग काय माझा आज उपवास !!" बळेच तोंडावर हसू आणत वसुधा बोलली. एकंदरीत आजचा दिवस सगळ्यांच्या घरचे प्रॉब्लेम्स ऐकण्यातचं जाणार दिसतय. 

मी माझ्या टेबल समोरील खुर्चीत येऊन बसले. पीसी वरील वर्कशीट कडे पाहता पाहता माझं मन भूतकाळात शिरले. आमचे लग्न झाले त्यावेळी सासूबाई नोकरी करत होत्या. मामंजी नुकतेच निवृत्त झाले होते. माध्यमिक शाळेत शिक्षिका असल्यामुळे आई अगदी वक्तशीर होत्या! अतिशय शांत स्वभाव! मृदू बोलणं ! ठरलेल्या त्यांच्या दिनक्रमात कधीच बदल घडत नसे.

" बिपिन मध्ये सगळे तेच गुण उतरलेत !" नकळत मी पुटपुटले. लग्नाला दोन महिने झाले आणि एके दिवशी संध्याकाळी आई माझ्या खोलीत आल्या. बिपीन ऑफिस मधून यायचा होता आणि मामंजी फिरायला गेले होते.

ऐक ना रागिणी ! आपल्या कोथरूडच्या फ्लॅटचे पझेशन मिळतय या महिन्यात,  तू आणि बिपिन तिकडे शिफ्ट होता का ? मी चमकले, का हो आई ! माझं काही चुकलं का ? रडवेली होऊन मी म्हणाले. माझ्या चेहऱ्याकडे पाहून आई खळखळून हसल्या.

 अगं वेडे, नवं नवं लग्न झालंय तुमचं ! अशा वेळी एकमेकांना समजावून घ्यायला एकांत लागतो जोडप्यांना, अनायसे नवीन घराचा ताबा मिळतोय तर रहा तिकडे . एन्जॉय करा नव्या नवलाईचे दिवस!!" मी मोहरून गेले. आम्ही कोथरूडला शिफ्ट झालो. राजा राणी सारखा संसार सुरू झाला. आई आणि मामंजींचा रोज फोन येई. दिवस, महिने आणि वर्षे पटकन सरली !! आराध्य शाळेत जाऊ लागला .आईसुद्धा निवृत्त झाल्या. त्यांचे छंद जोपासू लागल्या. एकमेकांकडे येणं जाणं होई . आराध्य आईंकडे राहायला जात असे. आजी-आजोबांचं प्रेम , त्यांच्या बरोबर दंगा एन्जॉय करीत असे. आमच्या संबंधात कधीच कटुता आली नाही. बिपिन इतका समजूतदार नवरा मिळण्यासाठी तर माझं कित्येक जन्मांचं पुण्य खर्ची पडलं असावं !! मी दमून आली असेन तर त्याचं पटकन खिचडीचा कुकर लावणं ! कधीतरी हलक्या हाताने माझी थकलेली पावलं चेपून देणं !! खरंच याची बायको होण्याइतकी आपली लायकी आहे का ? नेहमी मला प्रश्न पडत असे.

" रागिणी मॅम सरांनी तुम्हाला अर्जंट बोलावलंय !" प्यून ने निरोप दिला आणि मी भानावर आले. मीटिंगमधील काही मुद्द्यांवर सरांशी चर्चा करून मी पुन्हा माझ्या जागेवर परतले. मन पुन्हा भूतकाळात भराऱ्या मारू लागले.

" आईने नव्या घराचे प्लॅनिंग आपल्या लग्नाच्या आधीपासूनच केलं होतं !! " एकदा एकांतात बिपिननं माझ्याजवळ गौप्यस्फोट केला.

" एकत्र राहून एकमेकांचे दोष काढत बसण्याऐवजी , वेगवेगळे राहून प्रेम जिवंत ठेवण्यासाठी तिची सगळी धडपड होती." ऐकून मी अवाक झाले होते. सासूने सुनेशी कसं वागावं याचा धडा आईंनी मला स्वतःच्या कृतीतून दिला होता. एका शब्दानेही त्याची वाच्यता न करता !!

ऑफिस मधून मी तरंगतच घरी पोहोचले. पटकन फ्रेश होऊन,आणि बिपीनच्या आवडीची डिश बनवून मी त्याची वाट पाहू लागले. कॅण्डल लाईट मध्ये डिनर एन्जॉय करून आम्ही बेडरूममध्ये आलो.

आज खुशीत दिसतीये एक मुलगी माझा मूड बघून बिपीन म्हणाला. "एका मुलामुळे मी कायमच खुश असते त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकत मी म्हणाले आणि आम्ही दोघे एकदमच हसलो.

 ऐक ना बिप्स आईंना आणि मामंजींना महिनाभर बोलवायचं का ?राहायला  मला खुप आठवण येते रे त्यांची !!" मी हळू आवाजात म्हणाले.

आलं वाटतं तुझं सासू प्रेम उफाळून  करतो उद्या सकाळी आईला फोन मनापासून हसत बिपिन उदगारला, आणि अधीरतेने मी त्याच्या मिठीत शिरले 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News