धुमsss बाईकची कमाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 June 2019

प्रीमियम मोटारसायकलची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. काही मोटारसायकल या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशाच काही प्रीमियम मोटारसायकलचा घेतलेला आढावा. 

प्रीमियम मोटारसायकलची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. काही मोटारसायकल या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशाच काही प्रीमियम मोटारसायकलचा घेतलेला आढावा. 

रॉयल एन्फिल्ड बुलेट 

युवकांना डोळ्यांसमोर ठेवून नव्या बुलेटची रचना केली आहे. रेट्रो लूकची बुलेट- 350 क्‍लासिक ग्राहकांमध्ये प्रिय आहे. नव्या "क्‍लासिक- 350'चे डिझाइन हे 1940 च्या दशकातील बुलेटशी मिळतेजुळते आहे. पण, नव्या मोटारसायकलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केलाय.

इंजिन 350 सीसी, 19.8 बीएचपी आणि 28 न्यूटनमीटर टॉर्कचे आहे. तसेच, ट्‌विन स्पार्कप्लग आणि फाइव्ह स्पीड गिअरबॉक्‍स आहे, त्यामुळेच बुलेटचा पिकअप जाणवतो. वजन दोनशे किलोच्या आसपास असल्याने गाडी भारदस्त वाटते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातून बुलेटला मागणी वाढते आहे. वीकेंड वा लॉंग ड्रायव्हिंगसाठी बुलेटला सर्वाधिक मागणी आहे. 

बजाज पल्सर 

देशातील सर्वाधिक काळ दीडशे सीसी वा त्यापेक्षा अधिक सीसीची मोटारसायकल म्हणून विकली जाणारी ही मोटारसायकल आहे. काळानुसार पल्सरची 135, 150, 180, 200, 220 मॉडेल लॉंच झाली. स्टाइल, डिझाइन, पॉवर, मायलेज, टेक्‍नॉलॉजी यांच्यामुळे पल्सर 150 ते 200 सीसी सेगमेंटमध्ये सर्वाधिक पसंत केली जाणारी बाइक आहे.

कंपनीने काळानुसार पल्सरमध्ये अनेक बदल केले. हे करताना तरुणच केंद्रस्थानी ठेवला. परफॉर्मन्स मोटारसायकल असूनही प्रतिलिटर 40 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक मायलेज या मोटारसायकली देतात. मोटारसायकलला ट्विन स्पार्क, डिजिटल मीटर, ट्यूबलेस टायर्स इत्यादी कंपनीनेच दिलेत. सेमी स्पोर्टस डिझाइनमुळे हायवेवर ही मोटरसायकल चालवण्याचा चांगला आनंद मिळतो. पल्सरची नेकेड स्पोर्टस, स्पोर्टस मॉडेलही उपलब्ध आहेत. 

यामाहा एफझेड 

देशातील वाढती एंट्री लेव्हल प्रीमियम मोटारसायकलची बाजारपेठ लक्षात घेता यामाहा कंपनीने दीडशे सीसीच्या मोटारसायकलवर लक्ष केंद्रित केलेय. यामाहाच्या जागतिक पातळीवरील एफझेड सीरिजमधील मोटारसायकलशी मिळतीजुळती "फेझर' कंपनीने भारतीय बाजारपेठेत आणली.

नेकेड मोटारसायकल संकल्पनेवर आधारित ही मोटारसायकल एफझेड नावाने ओळखली जाते. दिसायला भरभक्कम, स्पोर्टी लुकची ही मोटारसायकल ग्राहकांना आवडली. तिला 150 सीसीचे इंजिन, मोनोकॉक सस्पेन्शन, डिजिटल मीटर, एबीएस, पॉवर, मायलेजमुळे शहरातील तरुणांत ती चर्चेचा विषय आहे. एफझेडने यामाहाला दीडशे सीसीच्या सेगमेंटमध्ये स्थान मिळवून दिलेय. 

टीव्हीएस अपाचे 

टीव्हीएस मोटारला प्रीमियम सेगमेंटमध्ये अपाचे आरटीआर- 150मुळे वेगळी ओळख मिळाली. त्यामुळेच कंपनीने अपाचे मोटारसायकलमध्ये बदल करत मॉडेल लॉंच केले. 150, 160 सीसीबरोबर फ्यूएल इंजेक्‍शनचे प्रगत तंत्रज्ञानही बसवले. टीव्हीएसने ग्राहकांना सातत्याने नवीन देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मोटरसायकलमध्ये पहिल्यांदा पेटल डिस्कब्रेक लॉंच केला.

2011-12 मध्ये अपाचे आरटीआरचे 180 सीसीचे मॉडेल लॉंच केले. यास मागे आणि पुढे डिस्कब्रेकचे व्हर्जन, तसेच दुसरे दोन पेटल डिस्कब्रेकसह अँटी ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे एबीएस व्हर्जन लॉंच केले. नेकेड स्पोर्टस आणि दोनशे सीसी मोटारसायकलला देशात मागणी असल्याने "अपाचे आरटीआर- 200 4 व्ही'चा समावेश केला. या मोटारसायकलला दोनशे सीसीचे चार व्हॉल्व्हचे 20 बीएचपीचे ऑइल कूल्ड इंजिन आहे. त्यामुळे ही मोटरसायकल ताशी शून्य ते साठ किलोमीटर वेग 3.9 सेकंदात, तर ताशी शून्य ते 100 किलोमीटर वेग 12.7 सेकंदात गाठते, असा दावा आहे. 

थंडर बर्ड 

लॉंग ड्रायव्हिंगच्या आरामदायी प्रवासासाठी रॉयल एन्फिल्डची क्रूझर इन्स्पायर्ड डिझाइनची थंडर बर्ड मोटारसायकल आहे. या बाइकला 350 आणि 500 सीसीचे इंजिन आहे. शक्तिशाली इंजिनांपैकी एक आहे. मोटारसायकलची रचना नेहमीच्या क्रूझर मोटारसायकल डिझाइनपेक्षा वेगळी आहे.

पण, सध्याच्या एंट्री लेव्हल क्रूझरमधील थंडर बर्ड पॉवरफूल मोटारसायकल आहे. 350 सीसी इंजिनला 19.8 बीएचपी असल्याने पॉवर कमी पडत नाही. मागे बसणाऱ्याला आरामासाठी पॅडिंग सीट आहे. यावरून ताशी कमाल 107 किलोमीटरने प्रवास करता येतो. 500 सीसी इंजिनला 19.8 बीएचपी असून, ताशी कमाल वेग 130 किलोमीटर आहे. 

केटीएम ड्यूक 

युरोपातील ऑस्ट्रियन देशातील कंपनी ही बजाज ऑटोचा हिस्सा आहे. त्यांच्या मोटारसायकल या स्पोर्टस सेगमेंटमध्ये मोडतात आणि कंपनीची ओळखही त्यामुळेच आहे. पाच-सहा वर्षांपासून केटीएमने ड्यूकची विविध मॉडेल भारतात लॉंच केली.

सुरवातीस नेकेड स्पोर्टस प्रकारात लॉंच केलेली मॉडेल फूल फेअरिंगमध्ये उपलब्ध आहेत. केटीएम 200 सीसीची मोटारसायकल 25 एचपी क्षमतेची आहे, यावरूनच तिची पॉवर लक्षात येते. स्पोर्टस मोटारसायकलची आवड असणाऱ्यांसाठी केटीएम ब्रॅंडच्या मोटारसायकल नक्कीच चांगल्या आहेत. 

होंडा सीबी हॉर्नेट 

अनेक वर्षांपासून प्रीमियम मोटारसायकलमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न होंडा करीत आहे. युनिकॉर्ननंतर कंपनीने सीबी हॉर्नेट- 160 आर मोटारसायकल लॉंच केली. यास 160 सीसीचे इंजिन असून, 15 पीएस पॉवर आहे. या मोटारसायकलचा वेग ताशी कमाल 115 किलोमीटर आहे. स्टॅंडर्ड आणि डीलक्‍स मॉडेल उपलब्ध आहे.

पण, प्रीमियम मोटारसायकलमध्ये ही तुलनेने नवी मोटारसायकल आहे. होंडाची सीबीआर- 250 आर ही रेसिंग इन्स्पायर्ड प्रीमियम मोटारसायकल बाजारात उपलब्ध आहे. यास 250 सीसीचे 26.5 बीएचपीचे इंजिन आहे. ताशी कमाल वेग 135 किलोमीटर आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News