बोर्डाच्या परीक्षेत जास्त गुण मिळवायचे असतील तर वापरा 'या' स्मार्ट टिप्स 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020
 • पूर्वतयारी योग्य असेल आणि परीक्षेदरम्यान होणाऱ्या शुल्लक चुका टाळल्या तर जास्तीत जास्त गुण मिळवता येतील.

१८ फेब्रुवारीपासून बारावीची तर ३ मार्चपासून दहावीची बोर्डाची परीक्षा सुरु होत आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास सर्व झालेला असतो. वेळ असते ती उजळणी करण्याची..! परीक्षेच्या आधी उजळणी केल्यास जास्त अभ्यास लक्षात राहतो. मात्र ज्यावेळी परीक्षेत प्रश्नपत्रिका हातात येते, त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना घाम फुटतो. काही आठवेनासे होते. पण यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही. परीक्षेची पूर्वतयारी योग्य असेल आणि परीक्षेदरम्यान होणाऱ्या शुल्लक चुका टाळल्या तर जास्तीत जास्त गुण मिळवता येतील. जाणून घेऊ अशा काही टिप्स ज्यामुळे तुम्ही परीक्षेत घवघवीत यश मिळवू शकता. 

 1. एखाद्या विषयाची उजळणी करताना प्रत्येक धड्यानुसार अभ्यास करा. साधारणतः प्रत्येक धड्याला किती वेटेज असतं ते ठरलेलं असतं. त्याबाबत आपल्या शिक्षकांशी संवाद साधा. त्यानुसार महत्त्वाच्या धड्यांवर जास्त भर द्या. 
   
 2. उजळणी करताना प्रश्नपत्रिका सोडविण्याची तयारी करा. मागील काही वर्षांचे बोर्डाचे पेपर सोडविल्यास वेळेचा अंदाज बांधण्यास मदत मिळेल. याशिवाय कोणत्या धड्यातील किती प्रश्न विचारले गेले आहेत, त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार अभ्यास करा. 
   
 3. परीक्षेला गेल्यावर हातात प्रश्नपत्रिका पडल्यावर पॅनिक होऊ नका. प्रश्न पत्रिकेचे स्वरूप समजावून घ्या. कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत, ते पाहून त्यानुसार कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे ठरवून घ्या. येणारे प्रश्न सुरुवातीला सोडवा त्यानंतर उरलेला वेळ इतर प्रश्नांना द्या.  
   

   

 4. समजा, १४ मार्कांचा एक प्रश्न असेल आणि  सात मार्कांचे दोन प्रश्न असतील, तर वेळेनुसार सात मार्कांचे प्रश्न सोडविण्यावर लक्ष द्या. कारण लहान प्रश्न सोडविण्यास वेळ कमी लागतो, त्यासोबतच सात पैकी सहा किंवा साडेसहा मार्क मिळण्याची शक्यता अधिक असते. 
   
 5. गणित किंवा फिजिक्सचा पेपर सोडविताना प्रश्न स्टेपनुसार सोडवा. उत्तर जरी चुकले तरी स्टेप्सला मार्क मिळण्याची शक्यता असते.  
   
 6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उत्तरपत्रिकेत चुका टाळा. काही चुकल्यास त्यावर खाडाखोड करू नका. सरळ एक आडवी रेष मारून उत्तर पुढे पूर्ण करा. त्यामुळे उत्तरपत्रिका प्रेझेंटेबल दिसते. 

 7. भूगोल किंवा विज्ञान विषयातील आकृत्या काढताना त्या ठळक दिसतील अशा पेन्सिलचा वापर करून काढा. यावेळी उत्तरपत्रिका फाटणार नाही याकडे लक्ष द्या. आपली आकृती काढून झाल्यावर त्याभोवती बॉक्स काढून त्याखाली संबंधित आकृतीची माहिती आणि स्पष्टीकरण लिहा. 
   
 8. उत्तरे सोडविताना जास्तीत जास्त सूत्रांचा वापर करा. संबंधित प्रश्नाचे सूत्र उत्तरात लिहून अधोरेखित करा. त्यामुळे उत्तराला वेटेज येईल. 
   
 9. इतिहासाचा पेपर लिहिताना उत्तरे मुद्द्यांना अनुसरून लिहा, किंवा त्याला क्रमांक देऊन लिहा, जेणेकरून ते वाचण्यास सोयीस्कर जाईल. 
   
 10. प्रश्नपत्रिकेवर कोणत्याही प्रकारचे रफ वर्क करू नये. रफ वर्क करायचे असल्यास  उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर करून त्यावर रफ वर्क असं लिहावं, जेणेकरून उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांच्या ते लक्षात येईल. 
   

   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News