काव्यमैफल, गायन, चित्र प्रदर्शन आणि बरंच काही 

यिनबझ ऑनलाईन टीम
Friday, 22 February 2019

भावी नागरिक म्हणून त्यांना अपेक्षित असलेल्या पुणे शहराची झलक शाळकरी मुलांनी बनविलेल्या स्मार्ट पुणे आर्ट इंस्टॉलेशन्समध्ये दिसून आली. घोले रस्ता येथील राजा रविवर्मा कला दालनात या मुलांनी रेखाटलेल्या चित्ररूपी कलाकृतींच्या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

पुणे - पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजित ‘पुणे स्मार्ट आर्ट वीक’मध्ये अभिनेता राकेश वशिष्ट, श्‍यामची आई फाउंडेशनच्या संस्थापक शीतल बापट, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी ‘चिंटू’कार चारुहास पंडित उपस्थित होते. मुलांच्या कल्पनेतील स्मार्ट पुणे दाखवणारे हे प्रदर्शन २४ फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे. 

सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या वैभव जोशी, संदीप खरे आणि गायिका सावनी शेंडे यांच्या काव्यमैफलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. इस्राईल सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित डेव्हिड शुलमन यांनी नेहरू सभागृहात आयोजित इंडॉलॉजीवरील व्याख्यानातून महत्त्वपूर्ण माहिती विशद केली. पंडित पुष्कर लेले यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. राजा रविवर्मा कलादालनात मंजिरी मोरे यांचे लाइव्ह पोर्ट्रेटचे प्रात्यक्षिक झाले. 

अभिनेता राकेश बापट म्हणाले, ‘‘पुणे स्मार्ट सिटीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर ११ दिवसांचा स्मार्ट वीक हा कला महोत्सव आयोजित केला आहे, याचे कौतुक वाटते. पुणेकरांना कला दाखविण्याची आणि आस्वाद घेण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.’’

दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांना प्रशासनाशी जोडण्याचा ‘पुणे स्मार्ट आर्ट वीक’ हा एक प्रयत्न आहे. 

-डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News