गायक छगन चौगुले यांचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 22 May 2020

चौगुले यांच्या लोकसंगीताच्या अनेक कॅसेट विंग्स कंपनीने प्रकाशित केल्या. "संपूर्ण गोंधळ', "संपूर्ण जागरण', "नवनाथांच्या कथा', "खंडोबाच्या कथा' आदी अल्बममुळे त्यांना नावलौकिक मिळाला.

मुंबई : "नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली' या लोकप्रिय गाण्याचे गायक लोककलावंत छगन चौगुले यांचे (64) कोरोना संसर्गामुळे बुधवारी (ता. 20) रात्री निधन झाले. मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍ताच पत्नी, तीन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

छगन चौगुले यांचे "कथा चांगुणाची', "कथा श्रावण बाळाची', "आईचे काळीज', "अंबाबाई कथा : कथा तुळजापूरची भवानी', "कथा देवतारी बाळूमामा' असे अनेक कार्यक्रम लोकप्रिय झाले होते. या कार्यक्रमांच्या ध्ननिमुद्रिका विशेष गाजल्या होत्या. बुधवारी चौगुले यांची प्रकृती खालावली. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

छगन चौगुले हाडाचे लोककलावंत होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. त्यांना लोकसंगीताचा वारसा वडील रामचंद्र चौगुले यांच्याकडून मिळाला. लहानपणापासून त्यांच्यावर लोकसंगीताचे संस्कार झाले. भारूड, गवळणी, कथा, जागरण, गोंधळ असे कार्यक्रम ते वडिलांसोबत लहानपणापासून करू लागले. 1980 च्या दशकात कॅसेट, टेपरेकॉर्डरच्या जमान्यात लोककलावंतांना कुणाल, विंग्स, टी सीरिज, सरगम या कंपन्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. त्यातून अन्य लोककलावंतांसह छगन चौगुलेही नावारूपाला आले.

चौगुले यांच्या लोकसंगीताच्या अनेक कॅसेट विंग्स कंपनीने प्रकाशित केल्या. "संपूर्ण गोंधळ', "संपूर्ण जागरण', "नवनाथांच्या कथा', "खंडोबाच्या कथा' आदी अल्बममुळे त्यांना नावलौकिक मिळाला. यांनी अनेक कुलदैवतांची गाणी आणि लोकगीते गायली. लोकसंगीताचा वारसा त्यांनी पुढील पिढीलाही दिला. त्यांची मुलेही याच क्षेत्रात कार्यरत आहेत.

"बानू नवरी नटली'

छगन चौगुले यांना विशेष ओळख मिळवून दिली, ती "खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली; काल बाई सुपारी फुटली' या गाण्याने. आजही अनेक टीव्ही कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांचे महोत्सव आणि विविध समारंभांमध्ये हे गाणे वाजवले जाते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News